Ratnagiri : शासकीय रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा

रत्नागिरी : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील जिल्ह्यातील एकमेव शासकीय रक्तपेढीत सध्या मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा भासत आहे. निवडणुका, दिवाळीमुळे रक्तदान शिबिरे घेतली जात नाहीत. त्याचा मोठा फटका शासकीय रक्तपेढीला बसला आहे.

जिल्हा रुग्णालयात सर्व आजारांवरील शस्त्रक्रिया होत आहेत. त्यासाठी रोज सर्व रक्तगटाच्या किमान २५ रक्त बॅगांची आवश्‍यकता असते; मात्र रक्तदात्यांच्या कमतरतेमुळे रुग्णांच्या शस्त्रक्रिया खोळंबल्या आहेत. रक्तगटासाठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील रक्तकेंद्रामध्ये महिन्याभरापासून रक्ताची टंचाई आहे. त्यामुळे नातेवाईकांना रक्तगटाच्या बॅगेसाठी दारोदारी फिरावे लागत आहे. डेंगीबाधित, थॅलेसिमिया, प्रसूती, अपघातील रुग्णांसाठी रक्त मिळवण्यास अडचणी येत आहेत. जिल्ह्याच्या टोकावरून जिल्हा रुग्णालयात रुग्ण येतात. दिवसाला सुमारे ५०० जणांची बाह्यरुग्ण तपासणी होते. अपघात विभाग, प्रसूती विभाग, साथीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात दाखल होतात. काही रुग्णांच्या शस्त्रक्रिया करायच्या आहेत; परंतु रक्ताचा तुटवडा असल्याने त्या खोळंबल्या आहेत. त्यात भूलतज्ज्ञांचा विषयदेखील गंभीर आहे. एकच भूलतज्ज्ञ असल्यानेही काही शस्त्रक्रिया रखडल्याचे समजते.
जिल्हा रुग्णालयात मुळातच डॉक्टरांची कमतरता आहे. त्यात आता रक्ताच्या तुटवड्याने डोके वर काढले आहे. गेल्या महिनाभरात कोणतेच रक्तदान शिबिर आयोजित केलेले नाही. परिणामी, रक्तपेढीमध्ये रक्ताचा मोठा तुटवडा भासत आहे.

रक्तकेंद्रामार्फत आम्ही आपणास आवाहन करतो की, आपण आपल्या सामाजिक संस्था, मंडळे यांच्या माध्यमातून रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा आणि या रक्तदानासारख्या मोठ्या महान कार्यात सहभाग नोंदवून माणुसकीचे नाते जपावे. – डॉ. अर्जुन सुतार, जिल्हा रक्तसंक्रमण अधिकारी, जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 16-11-2024