तरुणांचे कोट्यवधी रुपये बुडवणाऱ्याला धडा शिकवा : ना. उदय सामंत

रत्नागिरी : वाटद पंचक्रोशीतील तरुणांच्या गाड्या भाड्याने घेऊन त्यांचे कोट्यवधी रुपये ज्यांनी बुडवले त्याला या निवडणुकीत पराभूत करून चांगलाच धडा शिकवा. दोन-तीन महिन्यात रत्नागिरीत समाजात तेढ निर्माण करणाऱ्या काही घटना घडल्या त्यामागे नुकताच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलेल्या व्यक्तीचा हात होता, असा खरमरीत आरोप महायुतीतील शिवसेना पक्षाचे उमेदवार उदय सामंत यांनी केला.

वाटद-खंडाळा येथे झालेल्या सभेत ते बोलत होते.

आघाडीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ वाटद-खंडाळ येथे आमदार भास्कर जाधव यांनी जाहीर सभा घेतली होती. त्या सभेला उत्तर देण्यासाठी गुरुवारी (ता. १४) महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांच्या प्रचारासाठी वाटद जिल्हा परिषद गटात सभा घेऊन शक्तीप्रदर्शन करण्यात आले.

या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य बाबू पाटील, महायुतीचे भाजपचे जिल्हा समन्वयक अॅड. दीपक पटवर्धन, राष्ट्रवादीचे बंटी वणजू, शांताराम मालप, वरवडे सरपंच विराग पारकर, माजी सभापती ऋतुजा जाधव, मेघना पाष्टे, प्रकाश साळवी, प्रकाश रसाळ, विवेक सुर्वे, विष्णू पवार, सुधीर वासावे, शरद चव्हाण, प्रथमेश गवणकर, योगेंद्र कल्याणकर, भाई जाधव आदी उपस्थित होते.

सामंत म्हणाले, बुधवारी वाटदमध्ये एक मेळावा झाला. पदाधिकारी माणसं जमतील म्हणून दोन तास येऊन खंडाळ्याच्या फाट्यावर थांबले होते नंतर तो मेळावा सुरू झाला. मी अनेकवेळा सांगितलंय की, माझ्यावर तोंडसुख घेतले किंवा मतदार संघात येऊन माझ्यावर जहरी टीका केली की, दुसऱ्या दिवशीच असे विराट चित्र दिसेल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही आणली आहे. उबाठाच्या पक्षप्रमुखांची रत्नागिरीत झालेली सभा ही दोन विधानसभा मतदार संघाची होती. माझी ही सभा फक्त ३० हजार लोकांच्या जिल्हा परिषद गटाची आहे. त्याला हजारो मतदार उपस्थित आहेत. मी पाचव्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहे. यापूर्वी तुम्हीच मला आशीर्वाद देऊन विधानसभेत पाठवले आहे. इथे येऊन जे माझ्यावर भाषण करून जातात त्यांना तर मी जमेत पण धरत नाही.

….ते ठाकरे गटात गेले !

एमआयडीसीत गोहत्येचा प्रकार घडला त्यानंतर एका महिला भगिनीवर अत्याचाराची घटना घडली. कोकणनगरमध्ये संघाचे संचलन निघाले, हे प्रकार घडले ते मी घडवले अशा पद्धतीचा सांगण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला; पण माझा तुमच्यावर, नियतीवर विश्वास होता. जी व्यक्ती हे सगळं घडवत होती ती त्यानंतर पंधरा दिवसांनी उबाठामध्ये गेली आणि विधानसभेचे तिकीट घेतले, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 16-11-2024