रत्नागिरी : दीपावलीच्या सुटीत प्रवाशांची गर्दी, बसेस उपलब्ध करून देण्यासाठी योग्य नियोजन तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दिलेल्या उत्कृष्ट योगदानामुळे रत्नागिरी विभागाला दहा दिवसांत ९ कोटी ५४ लाखांचे उत्पन्न मिळाले, शाळा, महाविद्यालयांना सुट्टी असल्यामुळे सण साजरा झाल्यानंतर पर्यटक जिल्ह्यात मोठ्या संख्येने आले. तसेच तिकीट सवलतीचा लाभ प्रवाशांनी घेतल्यामुळे एसटीतील प्रवाशांची गर्दी दहा दिवस कायम होती. पर्यायाने उत्पन्नात वाढ झाली.
गेल्या काही वर्षांत तोट्यात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाने आता उभारी घेण्यास सुरुवात केली आहे. दिवाळी सुट्टीत पर्यटकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रवाशांच्या मागणीनुसार गाड्या उपलब्ध करण्यात आल्या होत्या. ऐन सणासुदीच्या काळात अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सुट्या न घेता प्रवाशांच्या सेवेसाठी तत्परता दाखवली होती. दैनंदिन वेळापत्रकात काही बदल करून गर्दीच्या मार्गावर गाड्या वळवण्यात आल्या.
शासनाने राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना निम्म्या तिकीटदरात प्रवासाची सुविधा उपलब्ध केली आहे. ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनाही तिकीटदरात ५० टक्के सवलत दिली आहे तसेच ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवासाची सवलत दिल्यामुळे एसटीमध्ये प्रवाशांची गर्दी वाढली.
प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी गर्दीच्या मार्गावर बसफेऱ्या वाढवण्यात आल्या होत्या. अधिकारी, कर्मचाऱ्यांनीसुद्धा प्रवासीसेवेसाठी चांगले योगदान दिल्यामुळे रत्नागिरी विभागाला दहा दिवसांत भरघोस उत्पन्न मिळाले आहे. – प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी
साडेचार हजार फेऱ्या
नोव्हेंबर महिन्यात पहिल्या दहा दिवसांत ६४४ गाड्यांच्या ४ हजार ५०० फेऱ्यांद्वारे प्रवासी वाहतूक करण्यात आली. एकूण २० लाख ८२ हजार किलोमीटर प्रवास झाल्यामुळे दहा दिवसांत नऊ कोटी ५४ लाखांचे उत्पन्न मिळाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:40 PM 16/Nov/2024














