राजापूर : राजापूर तालुक्यातील पांगरे येथील चिंचवाडी धरणामधून परिसरातील १३ गावांसाठी प्रादेशिक नळपाणी योजना राबविण्यात येत आहे. मात्र या योजनेची पाईपलाईन्स चक गटारामधून खोदाई करून टाकली जात असून गटारे बुजविण्यात येत आहेत. यामुळे चुकीच्या पध्दतीने करण्यात येत असलेल्या कामाबद्दल शेंबवणे येथील ग्रामस्थांनी ठेकेदारांला धारेवर धरत कामच बंद पाडले.
परिसरातील १३ गावांसाठी असलेली ही नळपाणी योजना पूर्णतः चुकीच्या पद्धतीने राबविली जात असून ही योजना म्हणजे शासनाच्या पैशांचा गैरवापर असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून केला जात आहे. आता नळपाणी योजनेचे पाईप्स टाकताना रस्त्याची दुरवस्था केली जात आहे. ही योजना राबविण्याची गरज नसताना व मागणी नसतानाही ही योजना रेटून नेण्याचा प्रयत्न काही राजकीय पदाधिकारी करीत आहेत.
पदाधिकारी आता रस्त्याच्या होणाऱ्या दुरवस्थेची जबाबदारी घेतील काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्या शेंबवणे परिसरात पाईपलाईन टाकण्यात येत आहे. यावेळी ती चक्क गटारामधून खोदाई करून टाकली जात असून गटारे बुजविण्यात आली आहेत. यामुळे रस्त्याची अवस्था व पावसाळ्यात होणारे संभाव्य अपघात पाहून शेंबवणे येथील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला. संबधित ठेकेदाराला पाचारण करीत या संदर्भात प्रश्नांचा भडीमार करीत चांगलेच धारेवर धरले.
मुळातच राजापूर रेल्वे स्टेशन हा रस्ता सुमारे १५ वषनि साधारण सुस्थितीत झाला आहे. त्यामुळे हा रस्ता व्यवस्थित रहाणे गरजेचे आहे. जलवाहिनीच्या कामामुळे रस्ता उखडला जात आहे. यामुळे गटारे बुजविली जात आहेत. परिणामी, पावसाळ्यात पाणी रस्त्यावर येऊन रस्त्याची दुरवस्था होणार ही बाब ग्रामस्थांनी ठेकेदारांच्या निदर्शनास आणून दिली. व गटारे पूर्ववत करण्याची मागणी केली. पुढील काम अशा पद्धतीने न करता दोन मिटर आतून पाईपलाईन टाकण्यात यावी, असे सांगितले व पुढील काम थांबविले.
ते खोदकामात फसल्या चार बसेस
यापूर्वी खोदलेल्या साईडपट्टीमुळे पावसाळ्यात चारवेळा या मार्गावर एसटी बसेस अडकल्या होत्या. याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता सद्या खोदाई करण्यात येणाऱ्या कामामुळे होऊ शकते, अशी भीती व्यक्त करीत यामुळे शेबवणे ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत काम थांबविले आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनाही धारेवर धरल्याचे वृत्त आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:39 PM 16/Nov/2024














