खेड : ऐन निवडणुकीच्या तोंडावर लोटे येथील भाजप कार्यकर्त्यांचे राजीनामे

लोटे : खेड तालुक्यातील लोटे येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आपले राजीनाम्याचे पत्र भारतीय जनता पार्टीचे खेड तालुकाध्यक्ष किशोर आंब्रे यांना पाठवले असून विधानसभेच्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असतानाच भारतीय जनता पक्षाला पर्यायाने महायुतीला मोठा दणका दिला आहे. याचे परिणाम येणाऱ्या २३ तारखेला विधानसभा निकालात नक्कीच पहावयास मिळतील, गुहागर मतदारसंघाच्या २०२४ च्या निवडणुकीसाठी महायुती च्या वतीने शिवसेना शिंदे गटाचे राजेश बेंडल, महाविकास आघाडीच्या वतीने उ.बा. ठा. शिवसेनेचे भास्कर जाधव, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमोद गांधी तर रा. स. प. चे प्रमोद आंब्रे यांच्याशिवाय अन्य दोन अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. यामुळे कोणाही एका उमेदवाराला लक्षणीय मताधिक्य घेऊन विजय मिळवता येईल असे चित्र सध्या तरी दिसत नाही.

त्यातच मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असतानाच भारतीय जनता पार्टीच्या लोटेमधील शेकडो कार्यकर्त्यांनी अचानक राजीनाम्याचे पत्र तालुकाध्यक्षांकडे पाठवले आहे. यामध्ये लोटेचे माजी उपसरपंच तथा भाजपा युवा मोर्चाचे सचिन सुभाष चाळके, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस संकेत हुमणे, तालुका चिटणीस मंगेश शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश आंबेडे, माजी सरपंच प्राजक्ता हुमणे, असगणीचे माजी सरपंच अनंत नायनाक, धामणदेवी बूथ अध्यक्ष संदेश खेराडे, लोटे बूथ अध्यक्ष गणेश गोवळकर, धामणदेवी ११४ चे बूथ अध्यक्ष संदीप साळवी इत्यादींसह १३८ पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. राजीनाम्याचे पत्र भाजपा तालुकाध्यक्ष किशोर आंब्रे यांच्याकडे पाठविले आहे. याबाबत विचारले असता, या कार्यकर्त्यांनी, पक्षातील अंतर्गत मतभेद आणि चढाओढ आम्हाला अस्वस्थ करते. या अंतर्गत राजकारणाला कंटाळून आम्ही राजीनामे देत आहोत, असे सांगितले. दरम्यान, अचानक बसलेल्या या धक्क्याने भारतीय जनता पार्टीबरोबरच महायुतीचेही कितपत नुकसान होते आणि याचा फायदा नक्की कोणाला होईल हे येत्या २३ तारखेला तारखेला लागणाऱ्या निकालावरूनच समजेल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:52 PM 16/Nov/2024