गुहागर समुद्र किनारी हंगामातील कासवाचे पहिले घरटे

गुहागर : येथील समुद्र किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाचे पहिले घरटे सापडले. वनविभाग आणि कांदळवन प्रतिष्ठानच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी या घरट्यातील ११७ अंडी संरक्षित केली आहेत. नव्या हंगामातील राज्यातील पहिले घरटे मिळणारा गुहागर हा या वर्षीचा पहिला समुद्र किनारा आहे.

गुहागर बाग परिसरातील समुद्र किनाऱ्यावर शुक्रवारी (ता. १५) कासव मित्र फिरत होते. त्यावेळी समुद्र किनाऱ्यावर अंडी घालून गेलेल्या कासवाच्या पाऊलखुणा त्यांना दिसल्या. या खुणांचा मागोवा घेतल्यावर कासव मित्रांना घरटे सापडले. तातडीने कासव मित्र

तोडणकर यांनी वनपाल अमित निमकर यांना बोलावले. वनपाल निमकर आणि वनरक्षक गायकवाड यांच्या उपस्थितीत कासवाचे घरटे उपसून मार्गदर्शक सूचनांनुसार त्यातील अंडी बाहेर काढण्यात आली. ऑलिव्ह रिडले प्रजातीची मादी कासव साधारणपणे नोव्हेंबर महिन्यात अंडी घालण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर येतात. गेली दोन वर्षे सातत्याने गुहागरच्या समुद्र किनाऱ्यावर सर्वाधिक कासवे अंडी घालण्यासाठी आली. मात्र गेली दोन वर्षे कासवाची अंडी मिळण्याचा कालावधी जानेवारीपर्यंत लांबला होता.

या पार्श्वभूमीवर गुहागरला नोव्हेंबर महिन्यात अंडी मिळणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. दरम्यान, गतवर्षी ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात व्यत्य (ता. राजापूर) येथे कासवाचं पहिले घरटे आढळलेले होते. यंदा पाऊस उशिरापर्यंत होता आणि थंडी पडण्यास विलंब झाल्यामुळे कासवांचा अंडी घालण्याचा हंगाम लांबल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आज घरटे सापडत्यानंतर तात्पुरती शेड करून त्यात संरक्षित करण्यात आले आहे. गुहागरमधील घरटी मिळण्याचे प्रमाण पाहता, मोठी शेड उभारावी लागते. ही शेड उभारण्याचे काम सुरू आहे. अमित निमकर, वनपाल, गुहागर

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:03 PM 16/Nov/2024