राजापूर : राजापूर, लांजा-साखरपा विधानसभा मतदार संघातील मतदान व मतमोजणी प्रक्रियेसाठी प्रशासनाकडून सर्व तयारी पुर्ण करण्यात आली आहे. मतदार संघातील ३४५ मतदान केंद्रावर सुमारे तीन हजार कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून मंगळवारी १९ नोव्हेंबर रोजी सर्व साहित्य व कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना होणार असल्याची माहिती राजापूर प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. जॅसमिन यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
राजापूर विधानसभा मतदार संघाची मतमोजणी हातिवले येथील आबासाहेब मराठे महाविद्यालयात शनिवार २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता सुरू होणार असून २० टेबलवर २५ फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार असल्याचे डॉ. जॅसमिन यांनी सांगितले.
राजापूर, लांजा-साखरपा विधानसभा मतदार संघातील मतदान व मतमोजणी प्रक्रियेची एकूणच तयारी याबाबत माहिती देण्यासाठी डॉ. जॅसमिन यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. ८५ वर्षावरिल ज्येष्ठ मतदारांसाठी घरी जाऊन मतदान नोंदणीची पहिली फेरी सुरू झालेली असून एकूण नोंदणी केलेल्या ६१३ व दिव्यांग १०६ अशा एकूण ७१९ मतदारांपैकी २३५ जणांनी शुक्रवार पर्यंत मतदान केले आहे. दुसरी फेरी १७ नोव्हेंबर रोजी होणार असून या फेरीत अनुपस्थित असलेल्या मतदारांना त्यांनतर मतदान केंद्रावरही मतदान करता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
मतदार संघातील एकूण १७३ मतदान केंद्रावर वेब काष्टींग होणार असून राजापूर भटाळी येथील विश्वनाथ विद्यालयातील २४० मतदान केंद्र खोली क्रमांक दोन हे सखी मतदान केंद्र, लांजा गोंडेसखल येथील जि. प. पुर्ण प्राथमिक शाळा क्रमांक पाच खोली क्रमांक १ येथील ९३ क्रमांकाचे मतदान केंद्र हे दिव्यांग मतदान केंद्र तर युवा मतदान केंद्र तर लांजा येथील अलअमिम उर्दू हायस्कूल येथील खोली क्रमांक एक ८५ क्रमांकाचे मतदान केंद्र हे युवा मतदान केंद्र म्हणून जाहिर करण्यात आल्याचेही डॉ. जॅसमिन यांनी सांगितले. अंध तसेच आजारी मतदारांना मतदनिसाच्या सहाय्याने मतदान करता येणार असून त्याबाबत असलेल्या नियमांचे पालन करून ते करावयचे असून तशा सुचना व साहित्य मतदान केंद्रावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
तर शुक्रवार अखेर ११२६ इतके पोष्टल मतदान झाले असून ही प्रक्रिया १९ पर्यंत सुरू असणार असल्याचेही त्यांनी सांगितले. १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता जाहिर प्रचार संपणार असून त्यानंतर जाहिर प्रचार करता येणार नाही. आत्तापर्यंत एक आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. तर तपासणी पथकाकडून आत्तापर्यंत एका कारवाईत दिड लाख रूपयांची रोकड ताब्यात घेण्यात आलेली आहे. मतदान प्रक्रियेसाठी ५१ एसटी बस सह अन्य खासगी वाहने आरक्षित करण्यात आली असून १९ नोव्हेंबर रोजी हातिवले आबासाहेब मराठे महाविद्यालयाच्या येथून सर्व मतदान साहित्य व कर्मचारी रवाना होणार आहेत. २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान प्रक्रिया होणार असून याच दिवशी सर्व मतदान यंत्रे ही हातिवले येथे जमा केली जाणार आहेत. मतदान प्रक्रिया, मतदान यंत्र सुरक्षितता व मतमोजणीसाठी योग्य त्या सुरक्षिततेबाबत खबरदारी घेण्यात आल्याचेही डॉ. जॅसमिन यांनी सांगितले. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी जनजागृती करण्यात येत असून जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावावा असे आवाहनही त्यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:42 PM 16/Nov/2024














