अपक्ष उमेदवार संजय यादवराव यांच्याकडून दहा वर्षांनंतरच्या कोकणाविषयीच्या परिषदेचे आयोजन

रत्नागिरी : राजापूर विधानसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार संजय यादवराव यांनी ऐन निवडणुकीच्या काळात राजापूर आणि लांजा तालुक्यांसाठी २०३४ मधील विकासाविषयीची परिषद आयोजित केली आहे.

ही परिषद येत्या रविवार, दि. १७ नोव्हेंबर रोजी राजापूर आणि लांजा येथे होणार आहे.

श्री. यादवराव यांनी २०१४ साली भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढविली होती. तेव्हा त्यांना सुमारे दहा हजार मते मिळाली होती. नंतरच्या काळात त्यांनी प्रत्यक्ष राजकारणापासून अलिप्त राहणे पसंत केले. श्री. यादवराव गेली २५ वर्षे कोकण विकासाच्या वेगवेगळ्या विषयात संपूर्ण कोकणात काम करत आहेत. या काळात त्यांनी कोकणविषयक विविध संस्था स्थापन करून त्यामार्फत मुंबई आणि कोकणात परिषदांचे आयोजन केले होते. यावेळी ते राजापूरमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. या काळात जाहीर प्रचार, गाठीभेटी यावर भर देतानाच त्यांनी पुढील दहा वर्षांच्या विकासाचे नियोजन आणि कृति आराखडा तयार करण्य़ाच्या दृष्टिकोनातून विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मान्यवरांच्या उपस्थितीत मंथन परिषद आयोजित केली आहे.

त्यातील लांजा व्हिजन २०३४ परिषद रविवारी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत शिवपार्वती मल्टीपर्पज हॉलमध्ये होईल. राजापूर व्हिजन २०३४ परिषद सायंकाळी ३ ते ६ या वेळेत राजापूर बाजारपेठेतील राधा मिलन चित्रमंदिर हॉलमध्ये होईल. पर्यटन, फळप्रक्रिया तसेच कोकणाशी निगडित विविध विषयांचे तज्ज्ञ परिषदेत सहभागी होणार आहेत.

राजापूर आणि लांजा तालुक्यासह संपूर्ण कोकणात रिकामी गावे, रिकाम्या होणाऱ्या शाळा, कमी होणारी लोकसंख्या आणि कमी होणारे उद्योग आणि व्यवसाय ही परिस्थिती बदलण्याकरिता पुढील १० वर्षांच्या विकासाचे आर्थिक विकासावर आधारित पूर्ण नियोजन करण्याच्या दृष्टीने शिवस्वराज्य कोकण संघटना पुढच्या काळात काम करणार आहे. अशा अनेक विषयांची प्राथमिक चर्चा करण्यासाठी राजापूर आणि लांजा येथे परिषदा आयोजित करण्यात आल्या आहेत. पुढील वर्षभरात राजापूर व लांजा तालुक्यातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व तज्ज्ञांच्या मदतीने एक संघटन निर्माण करण्याचा आणि सर्वांच्या विचारातून तालुक्याच्या विकासाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याचा त्यांचा मानस आहे. प्रत्येक गावात दहा कार्यकर्ते आणि उद्योगी राजकारणविरहित कार्यकर्त्यांचे संघटन ही त्यांच्या कामाची दिशा राहणार आहे या सर्व कार्यकर्त्यांच्या मदतीने एक मोठी लोकचळवळ राबवून दोन तालुक्यांच्या विकासाचे नियोजन करण्याचा प्रयत्न ते करणार आहेत.

दोन्ही परिषदांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन श्री. यादवराव यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:48 16-11-2024