चिपळूण उड्डाणपुलावरील पिलर कॅप तोडण्याचे काम अखेर पूर्ण

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चिपळूण शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलावरील पिलर कॅप तोडण्याचे काम अखेर पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता पुढील कामाला गती आली आहे. तसेच, पूल मजबुतीसाठी जुन्या दोन पिलरच्यामध्ये नवीन पिलर उभारण्यात येणार आहे. या कामाला गती आणण्यासाठी यंत्रणा अधिक वाढवली जाणार आहे.

चिपळुणातील उड्डाणपुलाच्या कामात तीन वर्षांपासून सातत्याने अडचणी येत आहेत. या पुलासाठी सुरुवातीच्या आराखड्यानुसार एकूण ४६ पिलर उभारण्यात आले होते त्यानंतर पुढील कामाला वेग घेत असतानाच १६ ऑक्टोबर २०२३ ला या पुलाचा बहादूरशेख नाका येथे काही भाग कोसळला. पूल कोसळल्यानंतर उभारणीतील काही त्रुटी समोर आल्या. त्यावर केंद्र शासनाने तज्ज्ञ समिती पाठवून पुलाची तपासणी केली. त्या समितीच्या सूचनेनुसार, राष्ट्रीय महामार्ग विभागाने या पुलाच्या डिझाईनमध्ये बदल केले आहेत. त्यामध्ये पूर्वीचे

पिलरमधील ४० मीटरचे गाळे रद्द करून त्यामधील अंतर कमी करण्यासाठी २० मीटरवर नव्याने पिलर उभारले जात आहेत. या नव्या रचनेनुसार २८२ पायलिंग उभारले जाणार आहेत. आतापर्यंत बहुतांशी पायलिंगचे काम पूर्ण होत आले आहे. गेले तीन महिने पिलर तोडाफोडीचे काम सुरू आहे. काही दिवसांपूर्वी अपघात घडून दोन कामगार जखमी झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर कंपनीने पिअर कॅप तोडण्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी बॅरिकेट्स उभारून काम सुरू ठेवले; मात्र आता कंपनीने आणखी यंत्रणा वाढवून काम वेगाने सुरू केले आहे. या कामातील पिअर कॅप तोडण्याचे काम अतिशय कठीण होते; मात्र कंपनीने हे आता पूर्ण केल्यानंतर उर्वरित कामाला वेग येऊ लागला आहे.

उड्डाणपुलाच्या नवीन आराखड्यानुसार पायलिंग व पिअरचे काम आता आहे. पायलिंग व पिअरच्या कामानंतर या कामाची गती आपोआप वाढणार आहे. त्यासाठी अजून काही दिवसांचा कालावधी लागणार आहे. श्याम खुणेकर, शाखा अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:03 PM 16/Nov/2024