संगमेश्वर : मुंबई-गोवा महामार्गावरील तुरळ-शिंदे आंबेरी परिसरातील प्रवाशांना गेल्या दोन वर्षांपासून पिकअप शेडअभावी त्रास सहन करावा लागत आहे. तुरळ स्टॉप तर नेहमी गजबजलेला असतो, तरीही तिथे निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवाशांना रस्त्यावर उन्हामध्ये ताटकळत उभे राहावे लागते. प्रवाशांना ऊन पावसाचा त्रास सहन करावा लागत आहे.
महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू झाल्यापासून प्रवासी मार्ग निवाऱ्याचा प्रश्न कायम सतावत आहे. अनेक प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झालेला आहे. शिंदे-आंबेरी येथील नागरिकांनी स्वखर्चातून तात्पुरती शेड उभारली आहे; परंतु एका बाजूला अजूनही ठेकेदारांकडून कोणतीच व्यवस्था करण्यात आलेली नाही. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम चालू असताना रस्ता खोदाई
करून निवारा शेड पाढण्यात आल्या. संबंधित ठेकेदारांनी बसथांब्यावर तात्पुरत्या स्वरूपाची निवारा शेड उभारणे आवश्यक होते; मात्र असंख्य ठिकाणी दोन्ही बाजूला शेडची व्यवस्था नसल्याने प्रवाशांना रणरणत्या उन्हात उभे राहावे लागते. पावसात तर प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडते. प्रवासी बसच्या प्रतीक्षेत महामार्गालगत उभे राहत असल्यामुळे वेगात येणाऱ्या वाहनांमुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांची ऊन, वारा आणि पाऊस यापासून बचाव करण्यासाठी महामार्ग प्रशासनाने त्वरित पिकअप शेड बांधावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
महामार्गावर अनेक ठिकाणांची झाडे तोडण्यात आलेली आहेत. त्यामुळे निवाऱ्यासाठी प्रवाशांना कोणताच पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे ऊन-पावसाचा मारा सहन करावा लागतो. याकडे प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे. उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. संतोष थेराडे, संगमेश्वर
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:16 PM 16/Nov/2024














