लांजा : कोत्रेवाडी येथील मतदान बहिष्कारासंदर्भातील बैठक चर्चेअभावी फिस्कटली

लांजा : कोत्रेवाडी येथील नागरिकांनी मतदानावर टाकलेल्या बहिष्कारासंदर्भात शुक्रवारी प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राजापूर विधानसभा यांनी लांजा तहसील येथे सकाळी ११ वाजता आयोजित केलेल्या बैठकीला लांजा तहसीलदार तसेच नगराध्यक्ष हेच अनुपस्थित राहिले. प्रांताधिकारी यांनीदेखील बैठकीचे कारण देत येण्यास असमर्थता दर्शविल्याने चर्चेअभावी ही बैठक फिस्कटली. याबद्दल ग्रामस्थांनीदेखील तीव्र नाराजी व्यक्त केली.

कोत्रेवाडी डम्पिंग ग्राउंडसंदर्भात योग्य ती भूमिका प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी यांच्याकडून घेण्यात न आल्याने अखेर कोत्रेवाडी ग्रामस्थांनी विधानसभा निवडणूक तसेच मतदानावर बहिष्कार टाकला आहे. आपल्या मागणीसंदर्भात प्रशासनाकडून किंवा लोकप्रतिनिधींकडून योग्य ती भूमिका घेतली जात नाही तोपर्यंत निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा ठाम निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. या संदर्भात प्रशासनाला निवेदन सादर केलेले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे प्रशासनाकडून मतदारांना मतदान करण्यासाठी विविध प्रकारे जनजागृती केली जात असताना दुसरीकडे मात्र कोत्रेवाडी ग्रामस्थांनी टाकलेल्या बहिष्कारासंदर्भात त्यांच्याशी चर्चा करावी किंवा त्यांनी मतदान करावे या दृष्टीने प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नव्हती. या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी राजापूर तथा प्रांताधिकारी यांनी गुरूवारी १४ नोव्हेंबरला दुपारी पत्र काढून कोत्रेवाडी ग्रामस्थांना काल शुक्रवारी १५ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता लांजा तहसील येथे चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली होती. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या या निर्णयाचा मान ठेवून कोत्रेवाडी ग्रामस्थ आज उपस्थित होते. विशेष बाब म्हणजे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी यांनी या बैठकीसंदर्भात पत्र काढताना या बैठकीला लांजा नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी हर्षला राणे त्याचप्रमाणे नगराध्यक्ष मनोहर बाईत यांनी व्यक्तीशः उपस्थित राहावे, अशा सूचना दिल्या होत्या, विशेष बाब म्हणजे आज शुक्रवारी सुट्टी असताना देखील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काढलेल्या पत्राचा मान ठेवून ग्रामस्थ उपस्थित होते; मात्र लांजा तहसीलदार त्याचप्रमाणे नगराध्यक्ष मनोहर बाईत यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली तर मीटिंगचे कारण देत प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी देखील ११ वाजता आयोजित या बैठकीला येण्यास असमर्थता दर्शवली तर बैठकीला उपस्थित असलेल्या नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी राणे यांनी ग्रामस्थांशी कोणत्याही प्रकारे संवाद साधला नाही, त्यांच्याशी चर्चा केली नाही. अशाप्रकारे व निवडणूक निर्णय अधिकारी यांनीच आज बैठक आयोजित केले असताना त्यांच्यासह नगराध्यक्ष आणि तहसीलदार हे देखील या बैठकीला अनुपस्थित राहिल्याने ही बैठक चर्चेअभावी फिस्कटली. या बैठकीला आपला वेळात वेळ काढून उपस्थित राहिलेल्या ग्रामस्थांनी यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली.

आजची बैठक रद्द झाली यावरून प्रशासन सुद्धा कोणाच्यातरी दबावाखाली आहे. हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. ग्रामस्थांच्या मागणीला हे चक्क केराची टोपली दाखवत आहेत. मंगेश आंबेकर (प्रकल्प विरोधी नेते, कोत्रेवाडी)

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:28 PM 16/Nov/2024