खेड : ‘ब्लॅक पँथर’ अत्यंत दुर्मीळ असून, खेड तालुक्यातील चाकाळे येथील एका शेतघराच्या अंगणात तो आढळला. तिथे लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तो कैद झाला. या व्हिडिओमधील ब्लॅक पँथरच्या खेड तालुक्यातील अस्तित्वामुळे प्राणीमित्रांनाही दिलासा मिळाला आहे.
खेडमधील शीतल पेठे यांच्या चाकाळे येथील शेतघराच्या अंगणात आलेला बिबट्या अर्थात ब्लॅक पँथर सीसीटीव्हीने अचूक टिपला आहे. अंगणात एका कुत्र्यालादेखील त्याची चाहूल लागल्याने तो देखील जोरजोरात ओरडत असल्याचे टिपले गेले आहे. या व्हिडिओमुळे खेड तालुक्यातील ब्लॅक पँथरचा आढळ असल्याचे अधोरेखित झाले. खेड तालुक्यातून ब्लॅक पँथर नष्ट झाल्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, या ब्लॅक पँथरच्या अस्तित्वाने प्राणीमित्रांसह येथील वनविभागाला दिलासा मिळाला आहे.
हा ब्लॅक पँथर ११ सप्टेंबरला २०२४ ला रात्री ९.३६ च्या सुमारास कॅमेऱ्यात कैद झाला होता. तो भक्ष्याच्या शोधात आला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. ब्लॅक पँथर अन्नाच्या शोधात मानवी वस्तीपर्यंत पोहोचत आहेत.
काळा बिबट्या आढळणे, ही बाब तशी दिलासा देणारी असली तरी जिल्ह्याच्या अनेक तालुक्यातील गावातील जंगलामध्ये या बिबट्याचे अस्तित्व आहे. ब्लॅक पँथर वनविभागाच्या कॅमेऱ्यात कैद व्हावा याकरिता ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. – सुरेश उपरे, वनाधिकारी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 AM 17/Sep/2024