रत्नागिरी : रत्नागिरी न. प. मालकीच्या जुन्या भाजी मार्केट इमारतीच्या उभारणीचे कामसुद्धा न्यायालयीन प्रक्रियेत रखडले जाणार आहे. यापूर्वी नवीन भाजी मार्केटच्या इमारतीचे बांधकामही गाळेधारकांनी न्यायालयात धाव घेतल्याने रखडले आहे. जुन्या भाजी मार्केटसंदर्भातील सुनावणी २४ ऑक्टोबरला होणार आहे.
रत्नागिरी शहराच्या मुख्य बाजारपेठेतील जुन्या भाजी मार्केटच्या इमारतीच्या बांधकामाला ४० वर्षपेक्षा अधिक काळ लोटला आहे. ही जुनी इमारत पाडून नवीन इमारत बांधण्याबाबत रत्नागिरी न.प.ने आवश्यक ती सर्व पूर्वतयारी केली. त्यानंतर गाळेधारकांना भाजी मार्केटची इमारत मोकळी करून देण्याची नोटीस बजावण्यात आली. ही इमारत धोकादायक झाल्याने इमारतीचा वापर तत्काळ बंद करण्यासंदर्भात निर्देश करणारी नोटीस बजावण्यात आली. या नोटीसविरोधात ३ गाळेधारक न्यायालयात गेले आहेत. कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब केल्याशिवाय रत्नागिरी नगरपरिषदेला इमारतीचा ताबा मिळू नये, यासाठी गाळेधारकांनी न्यायालयात दाद मागितली आहे. या प्रकरणी पहिली सुनावणी नुकतीच झाली असून, पुढील सुनावणीची तारीख २४ ऑक्टोबर आहे.
नवीन भाजी मार्केटची इमारतही फारच धोकादायक झाली असल्याचा स्ट्रक्चरल अहवाल आला. त्यानुसार भाजी मार्केटची इमारत पाडून नवीन इमारत उभारण्याची कार्यवाही सुरू झाली. त्यानुसार ‘रनप’ने गाळे मोकळे करून देण्याची नोटीस बजावली. या नोटीसविरुद्धही काही गाळेधारकांनी न्यायालयात धाव घेतली असून, हे प्रकरणही न्यायप्रविष्ट आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:29 PM 25/Sep/2024