आस्था सोशल फाउंडेशनच्या सुरेखा पाथरे यांचा कृतज्ञता पुरस्काराने गौरव

रत्नागिरी : वासंती दांडेकर प्रतिष्ठानने समाजात उल्लेखनीय, गौरवास्पद कार्य करणाऱ्या आस्था सोशल फाउंडेशनच्या सुरेखा पाथरे यांना कृतज्ञता पुरस्कार दिला आहे. या पुरस्कारामुळे आस्था संस्थेचे कार्य अधिक बहरणार आहे. समाजात आनंददायी वातावरण तयार करण्यासाठी असे पुरस्कार देणे आवश्यक असून, त्यानिमित्ताने असे कार्य समाजाला दीपस्तंभासारखे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ डॉ. दिलीप पाखरे यांनी केले.

वासंती दांडेकर प्रतिष्ठानचा दुसरा कृतज्ञता पुरस्कार आस्था सोशल फाउंडेशनच्या संस्थापिका सुरेखा पाथरे यांना डॉ. पाखरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी डॉ. पाखरे बोलत होते. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. विष्णुपंत जोगळेकर संकुल येथे हा कार्यक्रम झाला. या प्रसंगी दांडेकर प्रतिष्ठानचे अनिल दांडेकर व उमा दांडेकर प्रमुख उपस्थित होते. वृद्धाश्रम सुरू करणाऱ्या वीणा लेले यांना गेल्या वर्षी पहिला पुरस्कार दिला होता. यावेळी दिव्यांगांसाठी कार्यरत आस्था सोशल फाउंडेशनच्या पाथरे यांची निवड केली. ही निवड योग्य आहे. स्वमग्न (आऑटिझम) असलेल्या व्यक्ती हे डॉक्टरांना न उलगडलेले कोडे आहे. पाथरे यांचा मुलगा स्वमग्न असल्याचे कळल्यानंतर त्यांनी ही संस्था स्थापन केली. आज मोठे काम उभे राहत आहे. त्यांना समाजाकडूनही सर्व मदत मिळावी, असे डॉ. पाखरे यांनी आवाहन केले. सत्काराला उत्तर देताना सुरेखा पाथरे म्हणाल्या की, या सत्काराने संस्थेवरील जबाबदारी वाढली आहे. सर्व प्रकारच्या दिव्यांग मुलांसाठी उपचार, शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी संस्था प्रयत्न करत आहे. आता संस्थेतर्फे म्युझिक थेरपीची सुविधा रत्नागिरीत सुरू करायची आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 AM 18/Nov/2024