लांजा : उड्डाणपुलाच्या पिलरसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडलेल्या गायीची सुटका

लांजा : उड्डाणपुलाच्या पिलरसाठी खोदलेल्या खड्यात पडलेल्या गायीची लांजा येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांमुळे सुटका झाली. शुक्रवार, १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता या गायीला खड्यातून बाहेर काढण्यात आले.

लांजा शहरात मुंबई-गोवा महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलासाठी सध्या पिलर उभारणीच्या कामाने वेग घेतला आहे. लांजा साटवली फाट्या समोरील उड्डाणपुलासाठी खोदलेल्या खोल खड्यात एक गाय गुरुवारी रात्री पडली होती. या ठिकाणी खोदलेल्या खड्याभोवती संरक्षणाचे दृष्टीने कोणतीही उपाययोजना नसल्याने ही घटना घडली होती.

ही बाब लांजातील नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने या गाईला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पोलीस प्रशासनाला याची माहिती देण्यात आली. गाय पडलेला खड्डा हा खोल असल्याने तिला बाहेर काढणे सहजरित्या शक्य नव्हते. यासाठी नागरिकांनी तातडीने हालचाल करताना संबंधित महामार्ग ठेकेदार कंपनीच्या लोकांना माहिती दिली. तातडीने जेसीबी मागवण्यात आला. त्यानंतर गायीला रस्सी व अन्य साहित्याच्या मदतीने जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. नागरिकांच्या तत्परतेमुळे गायीचे प्राण वाचले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:39 PM 18/Nov/2024