रत्नागिरी : येथील खल्वायन संस्थेची ३०७ वी मासिक संगीत सभा मूळच्या आसामच्या श्रुती बुजरबरुवा यांच्या सुमधुर स्वरांनी रंगतदार झाली.
नेहमीप्रमाणे येथील सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात उत्साहात पार पडलेली ही मासिक संगीत सभा संजय मुळ्ये यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आली होती.
मैफलीमध्ये मूळच्या आसामच्या व सध्या मुंबईत वास्तव्यास असलेल्या प्रसिद्ध गायिका श्रुती बुजरबरुवा यांच्या शास्त्रीय ख्याल गायनाबरोबरच दादरा, अभंग व नाट्यसंगीत गायन केले.
रत्नागिरीच्या युवा गायिका व अभिनेत्री सौ. मधुरा लाकडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व नटराज पूजन झाले. त्यानंतर प्रदीप तेंडुलकर यांनी प्रास्ताविकात कलाकारांची ओळख करून दिली. संस्था अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या हस्ते सर्व कलाकारांना सन्मानपत्र, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
मैफलीची सुरवात श्रुती बुजरबरुवा यांनी पूरिया कल्याण या रागातील विलंबित एकतालात निबद्ध असलेल्या आज सो बन या बंदिशीने केली. याला जोडून द्रुत तीनतालातील मन हरवा आयो रे ही बंदिश त्यांनी पेश केली. पूरिया कल्याण रागाचे स्वरूप स्पष्ट करीत थोडक्यात सरगम, आलाप, ताना याद्वारे आपल्या सुमधुर आवाजाद्वारे त्यांनी मैफलीत सुरवातीलाच रंग भरला. त्यानंतर मोरी गुईयॉ सावरिया हा दादरा त्यांनी सादर केला. त्यानंतर अंग अंग तव अनंग व युवती मना दारुण रण ही दोन नाट्यपदेसुद्धा त्यांनी तेवढ्याच दमदारपणे सादर केली. शेवटी अवघे गरजे पंढरपूर हा अभंग गाऊन त्याला जोडून श्री विठ्ठलाचा गजर घेत त्यांनी आपल्या मैफलीचा गोड शेवट केला. मैफलीला तेवढीच समर्पक व दमदार साथ तबला – हेरंब जोगळेकर व हार्मोनियम साथ – चैतन्य पटवर्धन या रत्नागिरीच्या आघाडीच्या जोडगोळीने केली. तानपुरा साथ कु. अनुष्का देवरूखकर व तालवाद्य साथ प्रभंजन नाखरे यांनी केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:05 18-11-2024














