गुहागर : निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक अधिकारी, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती गुहागर यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मतदान विषयक विविध माध्यमातून जनजागृती सुरू केलेली आहे. २६४ गुहागर विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून मतदान होण्यासाठी लोकजागृतीसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. याचाच भाग म्हणून शाळांमधील विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना पत्र लिहून मतदानासाठी भावनिक साद घातली आहे.
विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना पत्र लिहिताना, अजूनपर्यंत तुम्ही माझे सर्व लाड पूर्ण केले आहेत. मीही तुमच्या शब्दाप्रमाणे अभ्यास करतो. परंतु आज मी तुमच्याकडून शब्द घेणार आहे, मतदान करण्याचा माझा हट्ट पुरवाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. भारत हा सर्वात मोठा लोकशाही असणारा देश आहे. माझ्या व आपणा सर्वांच्या भारतीयांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण तत्परतेने २० नोव्हेंबर रोजी घराबाहेर पडून मतदान करा व आपले कर्तव्य पार पाडा, असे पत्र लिहून भावनिक साद घालत पाल्यांनी आपल्या पालकांमध्ये मतदान जागृती केली आहे. गुहागर तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी पथनाट्य, रांगोळी, मॅरेथॉन, निबंध, वक्तृत्व स्पर्धा, पायी रॅलीच्या माध्यमातून मतदान जनजागृती केली. कौटुंबिक पत्र लेखनाद्वारे विद्यार्थी आई-वडिलांना घरातच समक्ष पत्र देऊन मतदान करण्यासाठी भावनिक आवाहन करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:20 PM 18/Nov/2024














