रत्नागिरी : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या शाळांमध्ये मतदान केंद्र आहे, अशा शाळांना दोन दिवस सुट्टी देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने घेतला होता. मात्र, शुक्रवारी (दि.१५) रात्री शिक्षण आयुक्तांनी नव्याने काढलेल्या पत्रानुसार ज्या शाळेत निवडणुकीच्या कामामुळे एकही शिक्षक नसतील त्या शाळांना मुख्याध्यापकांच्या अधिकारात सुट्टी घेता येणार आहे. त्यामुळे राज्यासह जिल्ह्यातील शाळांना सरसकट १८ व १९ नोव्हेंबरला सुट्टी नाही, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यात ३ हजार शाळा आहेत. त्यातील बहुतांश शाळेत मतदान केंद्र आहे. त्यामुळे त्यांना सुट्टी द्यायची का याबाबत संभ्रम होता. मात्र, आयुक्तांनी काढलेल्या सुधारित पत्रान्वये हा संभ्रम दूर झाला आहे. ज्या शाळेमध्ये मतदान केंद्र नाही, ज्या शाळेत शिक्षकांची उपलब्धता आहे, या शाळांना १८ व १९ नोव्हेंबरला सुट्टी घेता येणार नाही. त्या शाळा सुरूच राहतील.
दरम्यान जिल्ह्यात जवळपास दहा हजार शिक्षक आहेत. त्यातील हजारो शिक्षकांना निवडणुकीचे कामे लावण्यात आल्याने मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी शाळांना सुट्टी द्यावी, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे. मात्र, शिक्षण विभागाकडून याबाबत कोणताही नवीन निर्णय घेतला नाही. त्यामुळे शिक्षकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:35 18-11-2024














