रत्नागिरी : ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसाचा फटका जिल्ह्यातील सुमारे अडीच हजार हेक्टर क्षेत्राला बसला आहे. परतीच्या पावसानेही भात क्षेत्राचे नुकसान झाले होते. यामध्ये जिल्ह्यातील एक हजार सातशे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाबरोबरच अवकाळीमुळे कापलेली भातरोपे भिजली. त्यामुळे यंदा ३० टक्के उत्पादन घटण्याची शक्यता आहे.
यंदा जिल्ह्यात ६३ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. यंदा समाधानकारक पाऊस पडल्याने भात उत्पादन चांगले राहील, अशी शक्यता होती; मात्र ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परतीच्या पावसाला सुरवात झाली. त्यानंतरही अवकाळी पावसाचे सत्र सुरू राहिले. त्यामुळे भातकापणीचे वेळापत्रक विस्कळीत झाले. परतीच्या पावसात हळवे तर अवकाळीत निमगरवे
भात शेतीला फटका बसला. यात शेतकऱ्यांचे उभे असलेले भात पीक आडवे झाले आहे. आताही शेतकरी पंचनाम्याच्या प्रतीक्षेत आहेत. काहींनी पंचनाम्याची वाट न पाहताच भात झोडणी केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:22 PM 18/Nov/2024

.













