रत्नागिरी : मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरामधील आस्थापना मतदानादिवशी दिवसभर बंद

रत्नागिरी : जिल्ह्यात मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरामधील आस्थापना मतदानाच्या दिवशी, दि. २० नोव्हेंबर रोजी मतदान सुरू होऊन मतदान संपेपर्यंतच्या दिवसभराच्या कालावधीकरिता बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले आहेत.

विधानसभा निवडणूक आचार संहिता गेल्या १५ ऑक्टोबरपासून लागू झाली आहे. जिल्ह्यात दापोली, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर या पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता अमलात राहणार आहे.

जिल्ह्यात होणाऱ्या मतदान कालावधीमध्ये सर्व मतदान केंद्रांच्या परिसरात १०० मीटरच्या आतमध्ये असणारी दुकाने, टपऱ्या इत्यादी आस्थापना चालू राहिल्यास, तेथे विविध पक्षांचे कार्यकर्ते व इतर समाजकंटक विनाकारण जमा होऊन, विविध कारणांवरून त्यांच्यामध्ये वादविवाद झाल्यास सार्वजनिक शांतता व कायदा सुव्यवस्था बाधित होण्याची शक्यता असते. त्यामुळे मतदान प्रक्रियेमध्ये बाधा निर्माण होऊ शकते. कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता संपूर्ण जिल्ह्यामध्ये मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरामधील आस्थापना मतदानादिवशी दिवसभर बंद ठेवण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:31 18-11-2024