राजापूर : कोंढेतड, डोंगरतिठा रस्ता प्रवासासाठी ‘डेंजर झोन’

राजापूर : मुंबई-गोवा महामार्गावरील कोंढेतड आणि डोंगरतिठा येथील रस्ता आधीच तीव्र उतार आणि वळणांचा आहे. त्या परिसरात मुंबईकडून गोव्याकडे आणि गोव्याकडून मुंबईकडे भरधाव वेगाने जाणारी वाहने ये-जा करीत असतात. तसेच कोंढेतडच्या बाजूने डोंगरतिठा येथे जाण्यासाठी डावीकडून उजवीकडे वळणारी वाहने त्या रस्त्यावर येतात. अशा विचित्र स्थितीमुळे तिथे अपघाताला निमंत्रण मिळत असल्यामुळे कोंढेतड आणि डोंगरतिठा येथील रस्ता प्रवासासाठी ‘डेंजर झोन’ झाला आहे.

शहराजवळील कोंढेतड येथुन मुंबई-गोवा महामार्गावरून विविध भागांत जाणारे मार्ग वा रस्ते आहेत. त्यामध्ये या भागात वाहनांसह लोकांची नेहमीच वर्दळ अन् गर्दी असते. पाच महिन्यांपूर्वी कोळशाच्या ट्रकने दुचाकी उडवून मोटारीला दिलेल्या धडकेतून कोंढेतड गाडगीळवाडी येथे अपघात झाला होता. या अपघातातून महामार्गावरील ठिकाण धोकादायक असल्याचे प्रकषनि पुन्हा एकदा पुढे आले होते. महामार्गावरील कोंढेतड गाडगीळवाडी येथील परिसर वळणाचा आणि उताराचाही आहे. अर्जुना नदीवरील सर्वाधिक उंचीचाच पूल पार करून मुंबईकडून गोव्याकडे आणि गोव्याकडून मुंबईकडे भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांना येथील नागमोडी वळणांचा झपकन फारसा अंदाज येत नाही. त्याचवेळी डोंगर, विल्ये, जैतापूर आदी भागांमध्ये जाणारी वाहने मोठ्या पुलावरून रस्त्याने येत पुढे कोंढेतडच्या बाजूने डोंगरतिठा येथे जाण्यासाठी त्यांना महामार्ग पार करून डावीकडून उजवीकडे वळावे लागते. त्याचवेळी या भागातील पूर्वीच्या जुन्या रस्त्याने शहरामध्ये जा-ये करणाऱ्या वाहनांचीही वर्दळ असते. जुन्या रस्त्याच्या येथे कोणताही माहितीफलक लावलेला नाही.

मुंबई- -गोवा महामार्गावर कोंढेतड येथील वळणावर वेगवेगळ्या दिशेने वाहने येतात. त्याचा अनेकवेळा वाहनचालकांना अंदाज येत नाही. त्यामुळे याठिकाणी अपघाताच्यादृष्टीने हा परिसर डेंजर झोन झाला आहे. त्यामुळे याठिकाणी योग्य त्या उपाययोजना व्हाव्यात. – विकास देसाई, वाहनचालक

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:19 PM 18/Nov/2024