चिपळूण : मशालींच्या प्रकाशझोतात गोविंदगड उजळला !

चिपळूण : दरवर्षी शहरातील गोवळकोट येथील ऐतिहासिक गोविंदगडावर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त उत्सव साजरा केला जातो. यावर्षीही शेकडो मशालींच्या साथीने हा उत्सव साजरा करण्यात आला. मशालींच्या प्रकाशझोतात गोविंदगड उजळून गेला.

गोवळकोट येथील श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी देवस्थानच्या वतीने दरवर्षी हा उत्सव होतो. यावर्षीही गडाच्या पायथ्याशी असलेल्या मंदिरात दीपोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर शिवज्योत व पालखी भेट गोविंदगडावर नेण्यात आली. यावेळी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी देवस्थानचे अध्यक्ष अॅड. प्रसाद चिपळूणकर व अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा उत्सव झाला. गडाच्या चारही दिशांच्या बुरुजांवर मशाली पेटवून उत्सव साजरा केला. यावेळी स्थानिक कलाकाराने छत्रपती शिवाजी महाराजांची साकारण्यात आलेली वेशभूषा लक्षवेधी ठरली. त्याचप्रमाणे चिपळूण शहरातील जुना कालभैरव, नवा कालभैरव, गांधारेश्वर, गौतमेश्वर, विरेश्वर आदी मंदिर परिसरातही पारंपरिक पद्धतीने दीपोत्सव साजरा करण्यात आला.

श्री क्षेत्र परशुराम देवस्थानतर्फे यावर्षीही पारंपरिक पद्धतीने त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. मंदिरापासून काही अंतरावरील डोंगरमाथ्यावरील भव्य पणती प्रज्वलित करण्यात आली. याचा शुभारंभ शहरातील श्री देव जुना कालभैरव मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आला. श्री देव भार्गवराव मंदिरातून मशाल पेटवून बजरंग मित्रमंडळ व भाविकांनी पायरवाडीकडून दीपमाळेपर्यंत नेली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:22 PM 18/Nov/2024