रत्नागिरी : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्हॉट्सऍप ग्रुप ऍडमिन ना पोलिसांची नोटीस

रत्नागिरी : विधासभा निवडणुकीसाठी दिनांक २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. आज सायंकाळी ५ वाजता प्रचाराची मुदत संपली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर देखील निवडणूक आयोगाचे बारीक लक्ष आहे. प्रचार मुदत संपल्यावर सोशल मीडियावर प्रचाराची कोणतीही पोस्ट टाकल्यास कारवाई करण्याचा इशारा आता पोलिसांकडून देण्यात आला आहे. रत्नागिरी उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांच्या शाहीने व्हॉट्सऍप ग्रुपच्या ऍडमिनना नोटीस बजावण्यात आली आहे.

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६८ प्रमाणे या नोटीस ग्रुप ऍडमिन ना बजावण्यात आल्या आहेत. विधानसभा मतदार संघात ज्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत त्यांनी अथवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर कोणतीही प्रचाराची पोस्ट टाकू नये असे या नोटीस मध्ये म्हणण्यात आले आहे. इतर सदस्यांनी पोस्ट ग्रुपमध्ये टाकू नये यासाठी व्हॉट्सऍप ग्रुपचे सेटिंग ओन्ली ऍडमिन करावे असा सल्ला देखील या नोटिसीतून देण्यात आला आहे. अशी कोणतीही पोस्ट केल्यास त्या व्यक्तीला व ग्रुप ऍडमिन यांना आचारसंहिता भंग केल्या प्रकरणी जबाबदार धरून प्रचलित कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.