रत्नागिरी : वंचित बहुजन विकास आघाडीचे उत्तर जिल्हाध्यक्ष विलास ऊर्फ अण्णा जाधव यांच्यावर रविवारी (दि. १७ नोव्हेंबर) गुहागर तालुक्यातील नरवण येथील सावली हॉटेलच्या बाहेर तीन अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केला.
त्यांची गाडीचे देखील नुकसान केले. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे लोकसभेचे पराभूत उमेदवार काका जोशी यांच्यासह जिल्ह्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची सोमवारी भेट घेऊन हल्लेखोरांना अटक करण्यासंदर्भात निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, १७ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारच्या सुमारास वंचित बहुजन आघाडीचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष गुहागर तालुक्यातील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबले होते. तेथे काही हल्लेखोरांनी त्यांच्यावर भ्याड जीवघेणा हल्ला केला. हल्ल्यात मारहाण करून त्यांच्या गाडीचे नुकसान केले. हल्ला हा राजकीय सूडबुद्धीतून केला आहे. काही दिवसांपूर्वी गुहागर मतदारसंघातील उमेदवार भास्कर जाधव त्यांच्या प्रचारादरम्यान एका सभेत बौद्ध समाजाला जातिवाचक अपमानित वक्तव्य केले होते. त्याबाबत जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांनी कारवाईसंदर्भात तक्रार दाखल केली होती. मात्र अजूनही भास्कर जाधव यांच्यावर कारवाई झालेली नाही. मात्र आंदोलन करणाऱ्या आमच्या जिल्हाध्यक्षांसह पाच जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. हे अन्याय्य आहे, असे पत्रकात म्हटले आहे.
अण्णा जाधव यांच्यावर राजकीय द्वेषातून हा हल्ला झाला आहे. हल्लेखोरांसह त्यांना प्रवृत्त करणाऱ्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन तातडीने अटक करावी अन्यथा वंचित बहुजन आघाडी संपूर्ण रत्नागिरी जिल्हा आचारसंहितेच्या काळात रस्त्यावर उतरेल, असा इशाराही पत्रकात देण्यात आला आहे.
जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांना पोलीस सुरक्षा देण्यात आली आहे. या हल्ल्याच्या घटनेच्या तपासावर मी स्वतः लक्ष केंद्रित केले आहे. सखोल चौकशीची आदेशदेखील देण्यात आले आहेत, असे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. निवेदन सादर करताना काका जोशी, दक्षिण जिल्हाध्यक्ष गौतम गमरे, रत्नागिरी तालुकाध्यक्ष राजेंद्र कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष जाधव, जिल्हा महासचिव मुकुंद सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:20 19-11-2024














