खेड तहसील कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार केले बंद !

खेड : येथील तहसील कार्यालय आवारात प्रशासकीय वाहनांव्यतिरिक्त अन्य वाहने पार्किंग करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे निवडणूक प्रक्रियेसाठी मार्गस्थ होणारी वाहने उभी करण्याचा प्रश्न जटील बनला आहे. यामुळे तहसीलर कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून यावर उपाय शोधला आहे. मात्र, दैनंदिन कामकाजासाठी तहसील कार्यालयात वाहने घेऊन येणाऱ्यांसमोर, वाहने उभी करायची तरी कुठे, असा प्रश्न उभा ठाकत आहे.

येथील तहसील कार्यालयाचे आवार पार्किंगस्थळ बनले आहे. दैनंदिन कामकाजाव्यतिरिक्त येणाऱ्या अन्य वाहनचालकांची वाहने कार्यालयाच्या आवारात सर्रासपणे उभी केली जात आहेत. सध्या विधानसभा निवडणूक प्रक्रियेच्या कामासाठी वाहने तहसील कार्यालयाच्या आवारात येत असतात. मात्र आवार आधीच अन्य खासगी वाहनांनी ‘पॅक’ होत असल्याने वाहने उभी करण्याचा प्रश्न प्रशासकीय यंत्रणांसमोर उभा ठाकला आहे.

याचमुळे शासकीय वाहनांसह निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या वाहनांव्यतिरिक्त अन्य वाहनांना आतमध्ये येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. याकरिता मुख्य प्रवेशद्वारच बंद करण्याची वेळ तहसीलवर येऊन ठेपली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 AM 19/Nov/2024