चिपळूण : रेशनच्या धान्याचा काळाबाजार चिपळुणात उघडकीस आला आहे. अनेक महिने रेशनच्या धान्याची चोरी होत असल्याची तक्रार होत होती. अखेर चिपळूणमध्ये तब्बल सात क्विंटल इतके धान्य चोरल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी रमाकांत मोरे (रा. शिरळ) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत चिपळूण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक चालक कैलास शंकर सावंत (रा. देवरूख) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. तीन दिवसांपूर्वी रत्नागिरीहून रेशनचे धान्य भरलेला ट्रक चिपळुणात दाखल झाला होता. मात्र चालकाची प्रकृती बिघडल्याने हा ट्रक चिपळूण येथे शासकीय गोडावूनजवळ उभा होता. याचा फायदा घेत आरोपी रमाकांत मोरे याने या ट्रकमधील ५० किलोची १४ पोती लांबविली. यामध्ये शासनाचे १७ हजार ५०० रूपयांचे नुकसान झाले. अखेर या प्रकरणी चिपळूण पोलिसांत तक्रार दाखल होताच रमाकांत मोरे याने धान्य चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सातत्याने अशाच प्रकारे धान्याची चोरी होत असल्याचा संशय असून या बाबत सातत्याने तक्रारी होत होत्या. त्यामुळे या प्रकरणात अन्य कोणाचे हात गुंतले आहेत का याचा तपास पोलिस करीत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:26 AM 19/Nov/2024














