रत्नागिरी : प्रचार तोफा थांबल्या; आता छुप्या प्रचारावर जोर..

◼️ उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा उद्याची

◼️ जिल्ह्यात १३ लाख २३ हजार ४१३ मतदार

रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होत असून, मतदानाच्या दिवसाच्या अड्ठेचाळीस तास आधी म्हणजेच मंगळवारी सायंकाळी ६ वाजता जाहीर प्रचार थांबला आहे. त्यानंतर मतदानाच्या दिवसापर्यंत गुप्त प्रचाराला वेग येणार असून, ‘रात्रीस खेळ चाले’चा प्रत्यय दिसणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांत आता मंगळवारी कोण उमेदवार व त्याचे पदाधिकारी किती लोकांपर्यंत पोहोचतात, याकडेही विशेष लक्ष असणार आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीचा फिवर वाढला असून, रत्नागिरी जिल्ह्यातही महायुती विरोधात महाविकास आघाडी असा सामना रंगत आहे. यातही महायुतीमधील शिवसेना आणि आघाडीतील शिवसेना यांसह दोन्ही राष्ट्रवादी एकमेकांच्या आमने-सामने असल्याने प्रचारातील रंगत वाढली आहे. जिल्ह्यात महाविकास आघाडीने जाहीर प्रचाराऐवजी भेटीगाठीची ‘स्ट्रॅटेजी’ ठेवली आहे. तर महायुतीकडून जि. प. गटानुसार प्रत्येक मतदारसंघात बैठकांचा सिलसिला सुरू आहे.

विधानसभेसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळे ४८ तास आधी जाहीर प्रचार सायंकाळी ६ नंतर बंद झाला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस ‘रात्रीस खेळ चाले’ यामुळे गाठीभेटीचा कार्यक्रम वाढणार आहे. उमेदवार व त्यांचे सहकारी किती लोकांपर्यंत प्रत्यक्ष भेटून विजयासाठी आवाहन करताना यावर त्यांच्या विजयाचे गणित ठरणार आहे.

जाहीर प्रचार थांबल्याने पुढील दोन दिवस प्रशासनाचेही विशेष लक्ष जिल्ह्यात असणार आहे. मतदारांसोबत आर्थिक व्यवहार कोणी करू नये, यासाठीही यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणूक आयोगाकडून निवडणुकीसाठी नेमण्यात आलेले ऑब्झरव्र्व्हर जिल्हाभर फिरून पाहणी करीत आहेत. पोलिस यंत्रणाही सज्ज झाली आहे.

जिल्ह्यात १३ लाख २३ हजार ४१३ मतदार
जिल्ह्यात दापोली, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी व राजापूर हे पाच मतदारसंघ असून, यातील तीन आमदार महायुतीकडे, तर दोन महाविकास आघाडीकडे आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत जिल्ह्यावर युती की आघाडीचे वर्चस्व राहणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 AM 19/Nov/2024