अभ्यासाइतकेच ‘कले’ चे स्थान महत्त्वाचे : स्वप्ना दातार

रत्नागिरी : शिक्षणाबरोबरच आयुष्यातील कलेचे महत्त्व विशद करून आवडती कोणतीही कला जपा, जोपासा, वृध्दिंगत करा आणि त्यातून समृद्ध जीवनशैलीची आनंदानुभूती घ्या, असे मार्गदर्शन पुण्यातील शिक्षिका स्वप्ना दातार यांनी केले. चतुरंग प्रतिष्ठान या संस्थेच्या निवासी वर्गाच्या सांगता समारंभासाठी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

चतुरंग प्रतिष्ठान या संस्थेतर्फे वहाळ गावातील न्यू इंग्लिश स्कूल या शाळेत निवासी वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या वर्गाचा सांगता समारोप सोहळा सोमवार, दि. ११ नोव्हेंबर रोजी वहाळ शाळेच्या सभागृहात झाला. रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील २३ शाळांतील ५४ निवडक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या वर्गात सहभाग घेतला. यावर्षी मुलींची संख्या लक्षणीय होती. ३७ विद्यार्थिनी
व १७ विद्यार्थी वर्गात होते. या ५४ विद्यार्थ्यांबरोबरच चतुरंगच्या आणखी एका अभ्यासवर्गाचे (निर्धार निवासी अभ्यासवर्गाचे) विद्यार्थी- विद्यार्थिनीही या दिवाळीसुट्टीतील वर्गात प्रतिवर्षी सहभागी असतात.

दोन्ही वर्गातील मिळून एकूण ८६ मुले-मुली दिवाळी सुट्टीत एकत्र होती.

दिवसभरात ९.३० तासांच्या अभ्यासासोबत सुमारे ७ तासांची प्रातः स्मरण, वॉर्मिंग अप, योग प्रकार, सूर्यनमस्कार, योगासने, ओंकार साधना, विविध मैदानी खेळ, सामुहिक खेळगाणी, करमणूक, चिंतनयोग, वैचारिक गप्पागोष्टी, अभ्यासेतर व्याख्यान अशी संमिश्र आणि वैविध्यपूर्ण दैनंदिनी विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आखलेली होती आणि सर्व विद्यार्थ्यांनीही या सर्व गोष्टीत अतिशय उत्साहाने सहभाग घेतला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 PM 19/Nov/2024