खेड पोलिस कर्मचाऱ्यांच्या नवीन वसाहत उभारणीच्या कामास प्रारंभ

खेड : येथील पोलिस कर्मचाऱ्यांच्या नवीन वसाहतीसाठी ४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. नवीन पोलिस कर्मचारी वसाहत उभारणीचे कामही हाती घेण्यात आले आहे. जुनी पोलिस कर्मचारी वसाहत जमीनदोस्त करण्यात आली असून, सपाटीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. नवीन वसाहत उभारणीसाठी १८ महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

ब्रिटिशकालीन पोलिस कर्मचाऱ्यांची वसाहत पडझडीच्या उंबरठ्यावर होती. धोकादायक स्थितीतील वसाहतीत एकही पोलिस कर्मचारी वास्तव्यास नव्हता. जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांनी शिवसेना नेते रामदास कदम व आ. योगेश कदम यांचे लक्ष वेधले होते. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला अखेर यश आले. नवीन पोलिस कर्मचारी वसाहत उभारण्यासाठी ४२ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून ५२ अद्ययावत खोल्यांची उभारणी पोलिस कर्मचाऱ्यांसाठी करण्यात येणार आहे. पोलिस निरीक्षकांसाठीही स्वतंत्र निवासस्थान उभारण्यात येणार आहे. पोलिस कर्मचाऱ्यांसाठी खेळण्याकरिता स्वतंत्र मैदानासह त्यांच्या कुटुंबीयांसाठी दोन अद्ययावत उद्यानदेखील उभारण्यात येणार आहे.

याच ठिकाणी पोलिस ठाणे देखील उभारण्यात येणार आहे. पोलिस ठाण्यासमोरच मंदिर उभारण्यात येणार आहे. दैनंदिन कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांच्या विसाव्यासाठी खास व्यवस्थाही करण्यात येणार आहे. प्रत्यक्षात नवीन पोलिस वसाहत उभारण्याचे काम देखील सुरू झाल्याने लवकरच पोलिस कर्मचारी हक्काच्या घरात वास्तव्यास जाणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:10 PM 19/Nov/2024