रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालयाजवळच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याखालील पाया डळमळीत झाल्याने तेथील पुतळा काढून सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आला आहे. पुतळ्याखालील पाया भक्कम करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. येत्या १० ते १२ दिवसांत पायाचे काम होऊन तेथे पुतळा पुन्हा विराजमान होईल असे, रत्नागिरी नगरपरिषदेचे बांधकाम अभियंता यतिराज जाधव यांनी सांगितले.
रत्नागिरी शहरातील पुतळ्यांची सुरक्षितता तपासण्यासाठी स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हलत असल्याचे निदर्शनास आले. सिंधुदुर्गातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात जी घटना घडली ती घडून सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये यासाठी मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्या सूचनेनुसार अभियंता यतिराज जाधव यांनी तातडीने कार्यवाही सुरू केली.
सोमवारी सकाळी क्रेनच्या मदतीने पुतळा काढून तो रत्नागिरी न.प. च्या सभागृहात ठेवण्यात आला आहे. अभियंता यतिराज जाधव यांनी स्वतः उपस्थित राहून पुतळा काढून घेतला. क्रेनच्या मदतीने हा पुतळा रत्नागिरी नगरपरिषदेच्या सभागृहात आणून ठेवण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:27 PM 19/Nov/2024














