मतदान केंद्रात छायाचित्रण, व्हिडिओग्राफीला बंदी : आकाश लिगाडे

चिपळूण : चिपळूण विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने मतदारांना मतदान केंद्रामध्ये मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणे नेता येणार नाहीत. भारत निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या व्यक्तीशिवाय मतदान केंद्रामध्ये अन्य कोणत्याही व्यक्तीला छायाचित्रण किंवा व्हिडिओग्राफी करता येणार नाही, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे यांनी दिली आहे.

सकाळी ७ ते ६ पर्यंत चिपळूणमधील ३३६ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ च्या कलम १२८ नुसार मतदानाची गुप्तता राखणे आवश्यक आहे व अशी गुप्तता न राखल्यास त्याबाबत शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. भारत निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या व्यक्तीशिवाय मतदान केंद्रांमध्ये अन्य कोणत्याही व्यक्तीस छायाचित्रण किंवा व्हिडिओग्राफी करता येणार नाही. मतदान केंद्रामध्ये मतदारांना प्रवेश देताना त्यांच्याकडे मोबाईल फोन, कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक उपकरण असणार नाही, याची खातरजमा मतदान केंद्राबाहेरील सुरक्षारक्षक यांनी करूनच मतदान केंद्रामध्ये प्रवेश द्यायचा आहे. त्यामुळे मतदारांना मतदान केंद्रामध्ये मोबाईल व इतर इलेक्ट्रॉनिक्स साहित्य बाळगता येणार नाही. त्यांनी मतदान करण्यासाठी येताना त्यांचे मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक्स साहित्य आणले असल्यास ते मतदान केंद्राबाहेर ठेवून मगच मतदान केंद्रात प्रवेश करावा व प्रशासनास मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:49 PM 19/Nov/2024