देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील राजिवली, रातांबी मतदान केंद्रांवरील लोकसभा निवडणुकीतील टक्केवारी घसरल्याने राजिवली आणि रातांबी ही दोन्ही मतदान केंद्रे संवेदनशील मतदान केंद्रांच्या यादीत गेली. या दोन्ही केंद्रांवर मतदान टक्का वाढवण्यासाठी मतदारांनी सहभागी होऊन होळी आणि गणेशोत्सव सणासारखाच आपला लोकशाहीच्या मतदान उत्सवात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आपल्या मतदान केंद्रावरील टक्केवारी वाढवावी, असे आवाहन संगमेश्वर तालुका आचारसंहिताप्रमुख तथा गटविकास अधिकारी भरत चौगले यांनी केले.
लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत राजिवली मतदान केंद्रावर सरासरी ४० टक्के, तर रातांबी केंद्रावर ३५ टक्के मतदान झाले होते. ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झालेली जिल्ह्यातील मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित केली आहेत. यात राजिवली व रातांबी मतदान केंद्रांचा समावेश असल्याने या दोन केंद्रांवरील मतदान टक्केवारीचा आढावा घेण्यात आला. संतोष येडगे विश्लेषण मांडताना म्हणाले की, राजिवली आणि रातांबी केंद्राअंतर्गत येणाऱ्या मतदारांना स्थानिक पातळीवरील शाश्वत रोजगार नसल्याने तात्पुरत्या स्वरूपात शहरात स्थलांतरित होण्याची वेळ आली आहे.
मात्र, आपल्या गावाच्या विकासाप्रती निष्ठा बाळगून चाकरमानी या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन गावातील मतदानाचा घसरलेला टक्का वाढविण्यासाठी पुढाकार घेतील. विधानसभा निवडणुकीत आपल्या गावाचे संवेदनशील यादीतील नाव वगळण्यासाठी चाकरमानी पुढाकार घेतील, असा विश्वास या बैठकीत संतोष येडगे यांनी व्यक्त केला.
राजिवली, रातांबी या दोन केंद्रांचा आढावा घेण्यासाठी गटविकास अधिकारी भरत चौगले यांच्या उपस्थितीत रातांबी येथे बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीला संगमेश्वर पं. स. विस्तार अधिकारी शंकर घुले, राजिवली ग्रामपंचायत सरपंच दीपिका सावंत, संतोष येडगे, ग्रामविकास अधिकारी जाधव यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:20 PM 19/Nov/2024