साडवली : संगमेश्वर तालुक्यातील महावितरण शाखा कार्यालय कोसुंब व उपकेंद्र साडवली आयोजित वादळ, ऊन, वारा, पाऊस आणि इतर खडतर परिस्थितीत आपल्या जीवाची आणि कुटुंबाची पर्वा न करता अखंड ग्राहकसेवेचे व्रत जपणाऱ्या समस्त तांत्रिक बांधवांसाठी विद्युत सुरक्षा शिबिर नुकतेच साडवली येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महावितरण कंपनीतील कर्मचारी यांच्या अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेत महावितरण कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षित काम करण्यासाठी विशेष मार्गदर्शन म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरासाठी महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय साळी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी अपघातमुक्त महावितरण होण्यासाठी आपण एक सुरक्षा मार्गदर्शन टीम तयार करून अशा प्रकारचे सुरक्षा शिबिर विविध ठिकाणी आयोजित करू, असे सांगितले. कर्मचारी हे महावितरण कंपनीचे अनमोल संपत्ती आहे, त्यामुळे सर्वांनी सुरक्षितपणे काम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रभारी उपकार्यकारी अभियंता संगमेश्वरचे फारूक गवंडी यांनी प्रत्यक्षात अपघात कसे होतात, काम करताना घ्यावयाची काळजी, त्याच बरोबर काम करत असताना आर्थिंग किती गरजेची आहे ते समजावून सांगितले. उपकार्यकारी अभियंता मंडळ कार्यालय रत्नागिरी संदीप गावडे यांनी सुरक्षेविषयी माहिती देत असताना अपघात का होतात आणि अपघात होऊ नये म्हणून प्रत्येकाने घ्यावयाची काळजी याविषयी माहिती दिली. सहायक अभियंता रत्नागिरी विभाग मंदार ताटके यांनी काम करत असताना येणारा ताणतणाव आणि त्याचे व्यवस्थापन याबाबत माहिती दिली. महावितरणचे कर्मचारी आणि महावितरणचे ग्राहक यांच्याशी कसा सुसंवाद साधावा, याबाबत मार्गदर्शन केले. काम करताना सुसंवाद साधल्याने अपघातांचे प्रमाण निश्चितपणे कमी होण्यास मदत होईल, असे सांगितले.
कोसुंब कार्यालयातील वरिष्ठ तंत्रज्ञ योगेश लिंगायत यांनी कार्यक्रमाचे उद्दिष्ट सांगत सुरक्षा शिबिर आयोजन करणे काळाची गरज असल्याचे सांगितले. बदलत्या महावितरण प्रणालीसोबत कर्मचारी यांनीदेखील बदलणे गरजेचे आहे. म्हणून या कार्यालयाने स्वतः सुरक्षित काम करू आणि इतरांनादेखील सुरक्षित काम करण्याची सवय लावू, असा मूलमंत्र हाती घेतला आहे, असे सांगितले. या शिबिरात सर्व शाखा अधिकारी, बहुसंख्य तांत्रिक कर्मचारी, ठेकेदार आणि त्यांचे कर्मचारी, बाह्यस्रोत कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:26 PM 19/Nov/2024














