रत्नागिरी : पहिली ते पाचवी, पहिली ते दहावी, आठवी ते दहावी, आठवी ते बारावीच्या मुख्याध्यापकपदासाठीच्या शाळांतील संचमान्यता निकषात बदल करण्यात आला आहे. आता नव्या निर्णयानुसार मुख्याध्यापकपदासाठी १०० विद्यार्थी असणे आवश्यक आहे. याबाबत शालेय शिक्षण विभागाने शासन निर्णय जाहीर केला आहे.
पदनिश्चितीच्या प्रचलित धोरणामध्ये अधिक सुस्पष्टता आणण्यासाठी प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शाळांतील विद्यार्थी पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे निश्चित करण्याबाबतचा निर्णय दि. १५ मार्च २०२४ रोजी घेण्यात आला होता. त्यात मुख्याध्यापकपदासाठी १५० विद्यार्थी संख्या निश्चित करण्यात आली होती. मात्र या निर्णयाला राज्यभरातून विरोध करण्यात आला होता.
त्यानंतर त्यात आता सुधारणा करून मुख्याध्यापकपदासाठी १०० विद्यार्थी असणे आवश्यक, तर पूर्वीच्या मंजूर पदांस संरक्षण देण्यासाठी किमान विद्यार्थी संख्या ९० असणे आवश्यक असल्याचा निर्णय घेण्यात आला.
मुख्याध्यापकाचे पद अतिरिक्त ठरत असल्यास त्यांना संबंधित व्यवस्थापनाच्या अन्य शाळांमध्ये मुख्याध्यापकपदावर समायोजित करावे. समायोजनानंतरही त्याच व्यवस्थापनाच्या कार्यक्षेत्रात मुख्याध्यापकपद अतिरिक्त ठरत असल्यास संबंधित मुख्याध्यापकांना त्यांच्या कार्यरत ठिकाणी ते निवृत्त होईपर्यंत किंवा पटसंख्येत वाढ होईपर्यंत कायम ठेवावे. मुख्याध्यापकांच्या निवृत किंवा अन्य तत्सम कारणांनी पद रिक्त झाल्यानंतर संबंधित शाळेस सुधारित निकषानुसार पटसंख्येअभावी मुख्याध्यापकाचे पद लागू होत नसल्यास ते पद रद्द करावे, असे नमूद करण्यात आले आहे.
तसेच १५ मार्च २०२४ नुसार संचमान्यता केल्यानंतर मान्य होणारी खासगी अनुदानित शाळेतील शिक्षकांची पदे पायाभूत पदांपेक्षा वाढीव होणाऱ्या शिक्षकांच्या पदांच्या बाबतीत शासनाची मंजुरी आवश्यक असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
१५० विद्यार्थी संख्येच्या निर्णयाला विरोध
मुख्याध्यापक हे शाळा प्रशासनाच्या दृष्टीने महत्त्वाचे पद आहे. त्यामुळे राज्यातील शाळांतील मुख्याध्यापकांची पदे टिकण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे बोलले जात आहे. शिक्षण विभागाच्या २०१५ च्या निर्णयानुसार मुख्याध्यापकपदासाठी १०० विद्यार्थी संख्या आणि पद टिकण्यासाठी ९० विद्यार्थी संख्या आवश्यक होती. या निर्णयात बदल करून विद्यार्थी संख्या १५० करण्यात आली होती. या निर्णयाला मोठ्या प्रमाणात विरोध झाला. त्यामुळे आता मुख्याध्यापकपदासाठी पूर्वीचाच नियम लागू होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:19 PM 25/Sep/2024