खेडमधील कन्याशाळेच्या ‘त्या’ तीन वर्गखोल्यांची तात्पुरती दुरुस्ती

खेड : शहरातील पडझडीच्या उंबरठ्यावर असलेल्या कन्याशाळेच्या त्या वर्गखोल्यांची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आल्याने काही अंशी पालकांना दिलासा मिळाला आहे. याठिकाणी तीन मतदान केंद्रे आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून दुरुस्तीसाठी तातडीच्या साडेतीन लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. यातून वर्गखोल्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. हे काम पूर्णही झाल्याने मतदान केंद्राचा मार्ग सुकर झाला आहे.

शाळेच्या दुरुस्तीकडे वरिष्ठ शिक्षण विभागाने वर्गखोल्यांच्या कानाडोळा केला होता. मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्गखोल्यांच्या दुरुस्तीकरिता प्रशासनाला अखेर मुहूर्त मिळाला. या कन्याशाळेच्या इमारतीत तीन मतदान केंद्रे असून २० रोजी येथे मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर शाळेच्या तीन वर्गखोल्यांच्या दुरुस्तीकरिता साडेतीन लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. या वर्गखोल्यांच्या खिडक्यांची कामे पूर्ण करत वर्गखोल्यांच्या छताची कौले काढून नादुरुस्त भाग जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांतर्गत दुरुस्त करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:07 PM 19/Nov/2024