संगमेश्वर : रिंगीचे झाड जरी जंगली समजले जात असले, तरी त्याला येणाऱ्या फळांचा वापर पूर्वी कोकणात साबण अर्थात शाम्पू म्हणून केला जात असे. कोकणच्या ग्रामीण भागात पूर्वी प्रत्येक घरपरडघात एकतरी रिंगीचे झाड लावले जायचे. तरुण पिढी विविध शाम्पूचा वापर करू लागल्याने वापर आणि मागणी घटल्याने पूर्वी दहा ते बारा रुपये किलो असणारा रिंगीचा दर आता ५० पैसे ते दोन रूपये किलोएवढा झाला आहे. रिंगीच्या झाडाचे लाकूड टीकाऊ आणि मजबूत असते. ऑक्टोबर महिन्यात या झाडाला मोहर म्हणजेच तुरा येऊ लागतो. साधारण नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात प्रत्यक्ष फळधारणा होते. रिंग्या तयार झाल्या की, त्या आपोआप पडू लागल्यानंतर त्या वेचत्या जातात. हंगामाच्या अखेरीस रिंगी बाजारात विकण्याची वेळ आली की, पूर्ण झाड काठीने झोडपून सर्व रिंग्या काढल्या जातात. घरात आवश्यक असणाऱ्या रिंग्या ठेवून रिंग्यांची पोती भरून बाजारात विक्रीसाठी पाठवली जातात. रिंग्या पाण्यात भिजवून ठेवल्यानंतर काही वेळाने त्याला उत्तम फेस येतो. पूर्वी सोनारदेखील दागिने स्वच्छ आणि चकचकीत करण्यासाठी रिंगीच्या साबणाचा सर्रास वापर करत असत. रिंगीचा वापर होत नसल्याने बाजारात रिंगीला असलेली मागणी घटल्याने दरही गडगडले आहेत. परिणामी, रिंगीच्या झाडाची नव्याने लागवड पूर्णपणे बंद झाली आहे.
ऐंशी वर्षीय रेखाताई मुळ्ये यांनी आपण आजही रिंग्या वापरत असल्याचे सांगून यामुळे आपले केस आजवर सुरक्षित असल्याचे सांगितले. रिंग्या थोड्याशा खरडून घेतल्यानंतर त्याचा फेस अधिक येतो. रिंगीच्या साबणात कपडे धुतत्याने कपडे स्वच्छ तर होतात; पण अधिक टिकाऊ होतात. रिंगीच्या साबणाचा वापर केल्यास केसही गळत नाहीत. ५० पेक्षा अधिक वर्षे आपण रिंगीचा वापर करत आहो. – श्रीमती रेखाताई मुळ्ये, असुर्डे
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:14 PM 19/Nov/2024














