राजापूर तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत हजार मिमी जास्त पावसाची नोंद

राजापूर : तालुक्यात गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत यावर्षी सरासरी पावसाची नोंद समाधानकारक झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी एक हजार मिमी जास्त पाऊस पडला आहे. त्याचा फायदा तालुक्यातील एप्रिल-मे महिन्यातील संभाव्य पाणीटंचाई कमी होण्यास उपयुक्त ठरणार असून, पाणीटंचाईची झळ कमी होण्याची शक्यता आहे.

ऐन फुलोऱ्याच्या कालावधीमध्ये पडलेला पाऊस आणि त्यानंतर परतीच्या पावसाने दिलेल्या दणक्याचा यावर्षी भातशेतीला फटका बसला आहे. त्यातून यावर्षी भातशेतीचे उत्पादन घटण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे; मात्र शेवटच्या टप्प्यात पडलेला पाऊस पाणी टंचाईच्या झळा लांबणीवर टाकण्यास उपयुक्त ठरणार आहे.

पाच वर्षांमध्ये पडलेल्या पावसाचा विचार करता यावर्षी तालुक्यामध्ये सरासरी समाधानकारक पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी एक हजार मिमी जादा पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

वनराई बंधाऱ्यांचे कामही ठप्प
पंचायत समितीच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने लोकसहभागातून दरवर्षी गावागावांमध्ये वनराई बंधारे बांधून पाणीसाठा केला जातो; मात्र यावर्षी अद्यापही ग्रामपंचायतींच्या माध्यमातून वनराई बंधारे बांधण्याला सुरुवात झाली नसल्याची माहिती पंचायत समिती प्रशासनाकडून देण्यात आली. मुबलक असलेला पाणीसाठा आणि निवडणूक कालावधी असल्याने वनराई बंधारे बांधण्याचे काम सद्यः स्थितीमध्ये थांबले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:43 PM 19/Nov/2024