राजापुरात शेतकऱ्यांची रब्बी पिकाची लगबग

राजापूर : खरीपाचा हंगामातील भातशेती अंतिम टप्प्यात असताना तालुक्यामध्ये सध्या रब्बी हंगामाच्या शेतीची शेतांमध्ये लगबग वाढली आहे. खरिपाच्या शेतीला परतीच्या पावसाचा तडाखा बसून झालेल्या नुकसानीचे ओझे पाठीवर घेऊन शेतकरी राजा रब्बी हंगामातील शेतीच्या मशागतीमध्ये गुंतला आहे. तालुक्यातील ठिकठिकाणी विविध फळभाज्यांसह कुळीथ, आदींसाठी जमिनीची नांगरणी सुरू झाली आहे. काही ठिकाणी पेरण्या झाल्या असून काही ठिकाणच्या शेतांमध्ये रोपांची रुजवात झाल्याचे समाधानकारक चित्र दिसत आहे.

यावर्षीच्या खरिपाच्या भातशेतीला पावसाच्या लपंडावाचा वारंवार फटका बसला. अशा स्थितीतही भातशेतीचे पीक चांगल्या प्रकारे आले होते. त्यामुळे शेतकरी राजा मनोमन खुश होता; मात्र, पुन्हा एकदा परतीच्या पावसान घातलेल्या धुमाकुळामुळे हातातोंडाशी आलेल्या भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, त्यामुळे शेतकरी बेजार झाला होता. तरीही नव्या उमेदीने शेतकरी रब्बीचे पीक घेण्यासाठी सज्ज झाला आहे. रब्बी हंगामाच्या भात शेतीच्या मशागतीची ठिकठिकाणी शेतावर जोरात लगबग दिसत आहे. रब्बीच्या हंगामामध्ये शेतकरी कुळीथ, संकरित मका, कडधान्य, पावटा, उडीद, भाजीपाला, भूईमूग, हरभरा, मूग, कुळीथ पावटा, मूग यांसारख्या विविध प्रकारच्या भाज्यांच्या बियाण्यांची पेरणी करतात. सध्या नांगरणीच्या कामांची शेतामध्ये मोठ्या प्रमाणात लगबग वाढली आहे. परतीच्या पावसानेही शेतकऱ्यांना हात दिला आहे. परतीच्या पावसामुळे जमिनीमध्ये असलेल्या ओलाव्याचा फायदा घेत शेतऱ्यांनी शेतजमिनीची नांगरणी सुरू केली आहे. काही शेतकऱ्यांची नांगरणी आणि मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत. त्या शेतांमध्ये रब्बीसाठी पेरणी करण्याची कामे झाली आहेत.

खरिपामध्ये लागवड केलेली भातकापणी झाली असून, आता रब्बी हंगामाला सुरुवात झाली आहे. रब्बी हंगामामध्ये कडधान्यासह भाजीपाल्याची दरवर्षी लागवड करतो. त्याप्रमाणे यावर्षी लागवड सुरू आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे जमिनीमध्ये ओलावा आहे. त्याचा फायदा घेत नांगरणी आणि त्यानंतर बियाणी पेरणी सुरू आहे. – प्रभाकर जोशी, शेतकरी,
राजापूर

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:24 PM 19/Nov/2024