Ratnagiri : मतदानासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

रत्नागिरी : आज विधानसभेसाठी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी आणि राजापूर या पाच विधानसभा मतदारसंघात १ हजार ७४७ मतदान केंद्रे आहेत. या विधानसभा मतदारसंघनिहाय ईव्हीएम मशीनचे (मतपेट्या) वाटप पूर्ण आज झाले. तसेच मतदानासाठी साहित्य वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, मतपेट्या आणि मतदानाचे साहित्य आज पोलीस संरक्षणात त्या- त्या मतदान केंद्रांवर नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांसोबत रवाना करण्यात आले.

जिल्ह्यात १३ लाख मतदार

रत्नागिरी जिल्ह्यात दापोली, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी आणि राजापूर असे पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. या पाच विधानसभा मतदारसंघात १ हजार ७४७ केंद्रावर मतदान होणार आहे. जिल्ह्यात एकूण १३ लाख ३९ हजार ६९७ मतदार असून, यमध्ये पुरुष मतदारांची संख्या ६ लाख ४६ हजार १७६, तर महिला मतदारांची ६ लाख ९३ हजार ५१० इतकी आहे. या जिल्ह्यातून ४५ उमेदवार निवडणूक रिंगणात असून पाच पैकी चार मतदारसंघात मुख्य लढत शिंदे शिवसेना विरुद्ध ठाकरे शिवसेना यांच्यात असून एका मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशी आहे.

राज्य परिवहन महामंडळ सज्ज

मतदानासाठी राज्य परिवहन महामंडळ सज्ज झाले असून मतपेट्या ने-आण करण्यासाठी एस. टी. प्रशासनाने योग्य नियोजन केले आहे. उद्या होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी राज्य परिवहन महामंडळ सज्ज झाले असून मतपेट्या जिल्हाभरातील विविध मतदान केंद्रांवर पोहोचविण्यासाठी तसेच मतदान झाल्यानंतर त्या परत आणण्यासाठी २४० बसेसचे नियोजन करण्यात आल्याची माहिती महामंडळाचे रत्नागिरी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली. उद्या शालेय सुट्टी असल्याने शालेय फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. मात्र मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, पुणेसह इतरत्र जाणाऱ्या एसटीची सेवा पूर्वसुरू आहे.. जिल्हाभरातील कोणत्याही मार्गावरील नियमित एसटीची फेरी रद्द करण्यात आलेली नसल्याचे विभाग नियंत्रक श्री. बोरसे यांनी सांगितले.

जिल्ह्यातील ४५ उमेदवार निवडणूक रिंगणात

विधानसभा मतदारसंघनिहाय उमेदवार असे : २६३- दापोली विधानसभा मतदार संघ- संतोष सोनू अबगुल (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), योगेश रामदास कदम (शिवसेना), संजय वसंत कदम- शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे), प्रवीण सहदेव मर्चंडे (बहुजन समाज पार्टी), योगेश रामदास कदम (अपक्ष), योगेश विठ्ठल कदम (अपक्ष), संजय सीताराम कदम) अपक्ष, संजय संभाजी कदम (अपक्ष), सुनील पांडुरंग खाडे (अपक्ष), ज्ञानदेव रामचंद्र खांबे (अपक्ष).

२६४ गुहागर विधानसभा मतदारसंघ- प्रमोद सीताराम गांधी (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), भास्कर भाऊराव जाधव- शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे), राजेश रामचंद्र बेंडल (शिवसेना), प्रमोद परशुराम आंब्रे (राष्ट्रीय समाज पक्ष), संदीप हरी फडकले (अपक्ष), मोहन रामचंद्र पवार (अपक्ष), सुनील सखाराम जाधव (अपक्ष), संतोष लक्ष्मण जैतापकर (अपक्ष), संदेश दयानंद मोहिते (अपक्ष).

२६५ चिपळूण विधानसभा मतदारसंघ- प्रशांत बबन यादव (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी -शरदचंद्र पवार), शेखर गोविंदराव निकम (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी), अनघा राजेश कांगणे (अपक्ष), नसिरा अब्दुल रहमान काझी (अपक्ष), प्रशांत भगवान यादव (अपक्ष), महेंद्र जयराम पवार (अपक्ष), शेखर गंगाराम निकम (अपक्ष), सुनील शांताराम खंडागळे (अपक्ष).

२६६ रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ- उदय रवींद्र सामंत (शिवसेना), भारत सीताराम पवार (बहुजन समाज पार्टी), सुरेंद्रनाथ यशवंत माने- शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे), उदय विनायक बने (अपक्ष), कैस नूरमहमद फणसोपकर (अपक्ष), कोमल किशोर तोडणकर (अपक्ष), ज्योतीप्रभा प्रभाकर पाटील (अपक्ष), दिलीप काशिनाथ यादव (अपक्ष), पंकज प्रताप तोडणकर (अपक्ष).

२६७ राजापूर विधानसभा मतदारसंघ- किरण रवींद्र सामंत (शिवसेना), संदीप विश्राम जाधव (बहुजन समाज पार्टी), राजन प्रभाकर साळवी- शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे), अमृत अनंत तांबडे (अपक्ष), अविनाश शांताराम लाड (अपक्ष), राजश्री संजय यादव (अपक्ष), राजेंद्र रविंद्रनाथ साळवी (अपक्ष), संजय आत्माराम यादव (अपक्ष), यशवंत रामचंद्र हर्याण (अपक्ष).

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:08 20-11-2024