रत्नागिरी जिल्ह्यात 45 उमेदवार रिंगणात; 13 लाख मतदारांच्या हाती भवितव्य

रत्नागिरी : राज्यात विधानसभेसाठीची निवडणूक बुधवारी होत असून, रत्नागिरी जिल्ह्यात पाच विधानसभा मतदार संघात 1747 मतदान केंद्रांवर 13 लाख 39 हजार 697 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यातून 45 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जिल्ह्यात नवतरुणांसह वृध्द मतदारांची संख्याही मोठी आहे. प्रशासनाने जास्तीत मतदान व्हावे यासाठी अगदी ग्रामीण भागापर्यंत मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

जिल्ह्यात पाच विधानसभा मतदार संघासाठी बुधवारी सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपयर्र्त मतदानाचा हक्क मतदारांना बजावता येणार आहे. जिल्ह्यात 1747 विधानसभा मतदान केंद्र असून यात दापोलीत 392, गुहागर 322, चिपळूण 336, रत्नागिरी 352, राजापूर 345 मतदान केंद्र आहेत. यातील शहरीभागात 184 तर ग्रामीण भागात 1563 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.

दापोलीमध्ये 2 लाख 91 हजार 297 मतदार असून यात 1 लाख 39 हजार 895 पुरुष तर 1 लाख 51 हजार 402 महिला मतदार आहेत. गुहागर विधानसभा मतदार संघात 2 लाख 42 हजार 704 एकूण मतदार असून त्यात 1 लाख 15 हजार 511 पुरुष तर 1 लाख 27 हजार 193 महिला मतदार आहेत. चिपळूण मतदार संघात 1 लाख 34 हजार 883 पुरुष तर 1 लाख 41 हजार 183 महिला असे 2 लाख 76 हजार 66 एकूण मतदार आहेत. रत्नागिरी मतदार संघात 1 लाख 42 हजार 48 पुरुष तर 1 लाख 49 हजार 162 महिला अशा 2 लाख 91 हजार 221 एकुण मतदार आहेत. राजापूर मतदार संघात 2 लाख 38 हजार 409 एकूण मतदार असून यात 1 लाख 13 हजार 839 पुरुष तर 1 लाख 24 हजार 570 महिला मतदार आहेत. तर रत्नागिरी विधानसभा मतदार संघात 11 तृतीयपंथी मतदार आहेत.

जिल्ह्यात 24 हजार 589 नवमतदार असून ते प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामुळे नवतरुणांमध्ये बुधवारी होणार्‍या मतदानाबाबत उत्साह दिसत आहे. जिल्ह्यात शंभर वयावरील 394 मतदारांची नोंद प्रशासनाने केली आहे. यातही 110 वर्षापेक्षा अधिक वयाची एक महिला मतदाराची नोंद करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात 7 हजार 201 दिव्यांग उमेदवारांची नोंद आहे. सर्वाधिक दिव्यांग उमेदवारांची नोंद चिपळूणमध्ये आहे.

जिल्ह्यात 13 लाख 39 हजार 697 एकूण मतदार असून यात पुरुष मतदार 6 लाख 46 हजार 176 आहेत. तर 6 लाख 93 हजार 510 इतक्या महिला मतदार आहेत. पाच विधानसभा मतदार संघात मिळून 47 हजारहून अधिक महिला मतदार आहेत. प्रत्येक मतदार संघात आठ ते अकरा हजार इतक्या महिला अधिक आहेत. त्यामुळे पाचही ठिकाणी महिलाच उमेदवारांचे भविष्य ठरवणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:22 20-11-2024