दापोली : दापोली विधानसभा मतदारसंघात 392 मतदान केंद्रावर मतदान पथके पोहोचली आहेत. प्रत्येक मतदार केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष, 3 मतदान अधिकारी, 1 पोलीस कर्मचारी, 1 होमगार्ड, अंगणवाडी सेविका यांची नियुक्ती केली असून मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांना सहाय्य करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी नियुक्त असलेल्या हेल्पडेस्क सोबत स्वयंसेवक यांची नियुक्ती केली आहे. मतदान केंद्रावर महिला व पुरुष मतदारांसाठी स्वतंत्र रांगा असतील. दिव्यांग मतदारांसाठी व्हिलचेअरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी थेट प्रवेश असणार आहे.
एकूण 392 मतदान केंद्रावर 2 लाख 91 हजार दोनशे 97 इतके मतदार आहेत. मतदारसंघाची विभागणी एकूण 60 झोन मध्ये केलेली आहे. प्रत्येक झोनसाठी साधारण 5 ते 7 मतदान केंद्र आहेत. प्रत्येक झोनसाठी एक झोनल ऑफिसर, एक झोनल पोलीस ऑफिसर आणि एक राखीव अधिकारी देण्यात आलेले आहेत.
मतदानाची प्रक्रिया सुरळीत चालू ठेवण्यासाठी तसेच मतदान केंद्रावरील समस्या दूर करण्यासाठी मध्यवर्ती कंट्रोल रुम स्थापन करण्यात आली आहे. मतदानाची दोन तासाची आकडेवाडी गोळा करण्यासाठी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. 20 रोजी सकाळी 7 ते सायं. 6 या कालावधीत मतदान होणार आहे. आदर्श आचारसंहिता पालन करण्यासाठी भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत.
मतदान प्रक्रिया संपल्यानंतर सर्व मशीन या कोकण कृषी विद्यापीठाच्या सर विश्वेश्वरैय्या सभागृहाच्या सुरक्षा कक्षात ठेवण्यात येणार आहेत.23 रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
दापोली विधानसभा क्षेत्रातील सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा आणि लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी अजित थोरबोले यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:22 20-11-2024