रत्नागिरी : जिल्ह्यातील ५ विधानसभा मतदारसंघातील सर्व एक हाजर ७४७ मतदान केंद्रावर येत्या बुधवारी, दि. २० नोव्हेंबर होणाऱ्या मतदानाकरिता प्रथमोपचाराचे साहित्य सज्ज ठेवण्यात येणार आहे.
हिवाळा ऋतू असूनही दिवसा कडक उन्हाची तीव्रता लक्षात घेता त्या अनुषंगाने निवडणुकीसाठी सर्व नियुक्त अधिकारी, कर्मचारी तसेच मतदानासाठी येणाऱ्या मतदारांसाठी प्राथमिक आरोग्य सुविधा मिळावी यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार यांच्या सूचनेनुसार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व बूथवर प्रथमोपचार साहित्य ठेवण्यात येणार आहे. त्याची जबाबदारी तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर एक आरोग्य कर्मचारी किंवा आशा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
चक्कर, अशक्तपणा, अस्वस्थ वाटणे, ताप, डोके, अंगदुखी, जुलाब, पित्त, मळमळ, उलटी आणि जखम यासाठी औषधे असून आरोग्यविषयक तातडीच्या उपचारासाठी व संदर्भ सेवेसाठी १०८ व १०२ रुग्णवाहिका सज्ज आहेत. जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात त्या ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली.
सर्व मतदान केंद्रांवर पुरेशा औषध किटसह मतदानाच्या दिवशी मतदान प्रक्रिया सुरू झाल्यापासून मतदान पूर्ण होईपर्यंत सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:34 20-11-2024