रत्नागिरी जिल्ह्यात महिला नियंत्रित सहा मतदान केंद्रे

रत्नागिरी : केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘महिला नियंत्रित मतदान केंद्रे’ स्थापित करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात ४२६ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार आहेत. यामध्ये जिल्ह्यातील ६ मतदान केंद्रांचा समावेश असून, त्यावर महिला नियंत्रण करणार आहेत.

महिलांचा मतदानातील सहभाग वाढवण्यासाठी ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहे. महिला नियंत्रित मतदान केंद्रांमध्ये तैनात असलेल्या पोलिसांपासून ते निवडणूक कार्यावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह सर्वजण महिला असतील. लैंगिक समानता आणि मतदान प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागा संबंधातील वचनबद्धतेचा भाग म्हणून विधानसभा निवडणुकीसाठी महिला नियंत्रित महिला मतदान केंद्र असणार आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार, सर्व महिला नियंत्रित मतदान केंद्रात कोणताही विशिष्ट रंग वापरला जाणार नाही. तसेच मतदान केंद्रातील कुठल्याही खास राजकीय पक्षाच्या रंगाचा अनावश्यक वापर होणार नाही,याची काळजी घेण्यात आली आहे. ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापन करण्याच्या निर्णयामुळे महिलांचा मतदानातील सहभाग वाढण्यास मदत होणार आहे. महिला मतदान केंद्र निवडताना केंद्राची सुरक्षितता लक्षात घेतली जाणार आहे. संवेदनशील केंद्र टाळून तहसील कार्यालय, पोलिस ठाण्यानजीकच्या केंद्रांची तसेच ज्या मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांचा कायम संपर्क राहील, अशा केंद्राची या विशेष प्रयोगासाठी निवड केली आहे.

येथे आहेत महिला नियंत्रित मतदान केंद्रे
जिल्ह्यात सहा महिला नियंत्रित मतदान केंद्रे असून, त्यामध्ये दापोली, बोरज, मुरादपूर-चिपळूण, देवरूख, रत्नागिरी पालिकेतील प्रभाग क्र. ४, ६ तसेच राजापूर येथील भटाळी यांचा समावेश आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:54 AM 20/Nov/2024