रत्नागिरी : जिल्ह्यातील प्रत्येक मासेमारी नौकेवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे; मात्र बहुसंख्य मच्छीमारांकडून त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे मत्स्य विभागाकडून कोणती कारवाई केली जाणार, याकडे लक्ष लागले आहे.
मत्स्य व्यवसाय विभाग व सागरी सुरक्षा यंत्रणेतर्फे मासेमारी नौकांची तपासणी वेळोवेळी करण्यात येते. अशा मासेमारी नौकांवर कार्यरत असलेले नौकामालक, तांडेल व खलाशी यांचे मूळ ओळखपत्र, नौकेची नोंदणी याचे प्रमाणपत्र, मूळ मासेमारी परवाना, विम्याच्या प्रती तसेच नौकेवरील तांडेल व खलाशी यांची मानकानुसार (VRC) जीवनरक्षक साधने, अग्निशमन साधने नसल्याचे आढळते. अतिरिक्त तांडेल किंवा खलाशी आढळल्यास सागरी सुरक्षा यंत्रणेतर्फे अतिरिक्त तांडेल, खलाशांवर कार्यवाही करण्यात येते.
मच्छीमारांनी नौकेवर जीवनरक्षक साधनांसमवेत यांत्रिक नौकांवर व्हेसल ट्रकिंग सिस्टीम (व्हीटीएस), स्वयंचलित ओळखप्रणाली (एआयएस), जिल्हा अलर्ट ट्रान्समीटर (डीएटी) आदी यंत्रप्रणाली बसवणे आवश्यक आहे तसेच सागरी सुरक्षेचा हेतू लक्षात घेता प्रत्येक मासेमारी नौकेवर सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचे शासनाने आदेश दिले आहेत; मात्र मासेमारी नौका मालकांकडून त्याबाबत गांभीर्याने न घेता कॅमेरे बसवण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याकडे मत्स्य व्यवसाय विभागानेही अद्याप लक्ष न दिल्याने कॅमेरे बसवण्याचे आदेश कागदावरच राहिले आहेत.
आग लावलेली नौका कॅमेऱ्याविना
काही दिवसांपूर्वी रत्नागिरीतील एका मासेमारी नौकेवरील खलाशाने तांडेलाचा खून करून नौकेला आग लावली होती. या नौकेवर सीसीटीव्ही कॅमेरा बसवला नसल्याने दुर्घटनेचा अधिक तपशील हाती मिळालेला नाही. त्यामुळे अद्यापही नौकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:15 AM 20/Nov/2024