रत्नागिरी : जिल्ह्यातील मतदार यादीत समाविष्ट असलेल्या प्रत्येक मतदाराला मतदान करता यावे व मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आदेश जारी केला आहे. जिल्ह्यातील सर्व आस्थापना प्रमुखांना त्यांच्या अधिपत्याखालील सर्व अधिकारी, कर्मचारी, कामगार यांना बुधवार, २० रोजी मतदानासाठी भरपगारी सुट्टी अथवा काही तासांची सवलत मंजूर करण्याचे आदेश दिले आहेत.
निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रातील कोणत्याही क्षेत्रातील आस्थापनेतील मतदानाचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला, मतदानाच्या दिवशी सुट्टी दिली जाणार आहे. ही सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना इत्यादींना लागू राहील. निवडणूक क्षेत्रातील कामगार, अधिकारी, कर्मचारी, ते कामानिमित्त निवडणूक क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना मतदान करण्यासाठी भरपगारी सुट्टी द्यावी लागणार आहे. सुट्टीच्या कारणास्तव कोणत्याही व्यक्तीच्या वेतनात कोणतीही कपात केली जाणार नाही.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने, खासगी कंपन्या यामधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इत्यादींना लागू राहील.
अपवादात्मक स्थितीत पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर दोन ते तीन तासांची सवलत देता येईल. मात्र, जिल्हाधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 AM 20/Nov/2024