रत्नागिरी : अवैध मद्यविक्री विरोधात १३१ गुन्ह्यांची नोंद

रत्नागिरी : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून आजपर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्यविक्री विरोधात १३१ गुन्ह्यांची नोंद केली आहे. यामध्ये ११० संशयितांना अटक केली आहे.

हातभट्टीची गावठी दारू ३३४९ लिटर, देशी मद्य ६६.४२ बल्क लिटर, विदेशी मद्य ८२.२६ बल्क लिटर गोवा राज्यात विक्रीकरिता असलेले विदेशी मद्य ९७९५.९७ बल्क लिटर, रसायन ४१५०५ लिटर तसेच मद्याची अवैधरित्या वाहतूक करणारा टेम्पो, मोटार या दोन वाहनांसह एकूण १ कोटी ३० लाख ८३ हजार ९५ किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक कीर्ती शेडगे यांनी दिली. अवैध मद्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर असून त्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याकरिता या विभागाकडून ४ पथके नेमण्यात आली आहेत. जानेवारी २०२४ पासून आतापर्यंत दारूबंदी कायद्यानुसार २८ प्रकरणांत १६ लाख एवढ्या रक्कमेची चांगल्या वर्तणुकीची बंधपत्रे संशयितांकडून घेण्यात आली आहेत. आचारसंहिता लागू झाल्यापासून मुंबई-गोवा, कोल्हापूर-रत्नागिरी, चिपळूण- कऱ्हाड या महामार्गावरुन प्रवासी तसेच मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी या विभागाकडून करण्यात येत आहे. तसेच गोवा राज्यातून रेल्वेद्वारे अवैध मद्याची वाहतूक होऊ नये याकरिता कोकण रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून रेल्वे पोलिसांसमवेत अचानकपणे प्रवाशांच्या सामानाची तपासणी करण्यात येत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध मद्याविरुद्धची कारवाई यापुढेही सुरूच राहणार आहे.

महामार्गावर नाकाबंदी
महामार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तपासणी नाके आणि भरारी पथकांद्वारेही वाहनांची तपासणी केली जात आहे. अत्यंत कडकपणे ही मोहीम विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत कायम राहणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 AM 20/Nov/2024