वणवे रोखण्यासाठी उपाययोजना आवश्‍यक

रत्नागिरी : कोकणातील ग्रामीण आणि दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात वणवे लागत आहेत. वनविभागासह प्रशासनाने वणवे लागू नयेत यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे. वणव्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी शेतकरी आणि बागायतदारांकडून होत आहे.

सह्याद्रीच्या कडेकपारीत वसलेल्या पर्वतरांगांमध्ये कोकणातील प्रामुख्याने रत्नागिरी, रायगड आणि सिंधदुर्ग हे जिल्हे येतात. या भागात पाऊस ओसरल्यानंतर अनावश्यक रान काढण्याच्या नावाखाली वणवे लावण्याचे प्रकार घडत असतात. या डोंगराळ परिसरात असलेल्या गवतावर वणवे लावून डोंगर उजाड केले जातात. वणव्यामुळे परिसरातील अनेक झाडे प्रामुख्याने आंबा, कोकम, करवंदाच्या जाळ्या, जांभूळ अशी फळझाडे वणव्यात जळून नुकसान होते. काही शेतकऱ्यांनी फळ बागायती वृक्ष लागवड केली आहे. वणव्यामुळे या बागायतींना फटका बसतो. बागायतदार शेतकऱ्यांचे यामुळे लाखों रुपयांचे नुकसान होते. बागायतीमधील आंबा, काजू, कोकम आदी फळझाडांच्या बागायती होरपळून जातात. त्यामुळे या बागायतदारांच्या अडचणी वाढतात. गुरांना पावसाळी हंगामात चांगला चारा मिळावा याकरिता वणवे लावले जात असल्याचे सांगितले जाते. वणव्यामुळे कोकणची निसर्गसंपदा व फळ बागायतींची राख होत आहे. त्यामुळे वणवा लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहेत.

‘वणवामुक्त गाव’चे नियोजन करणे गरजेचे
शासनाने वनविभागाच्या माध्यमातून ‘वणवामुक्त गाव’चे नियोजन केले आहे. त्यामुळे संबंधित ठिकाणचे सरपंच यांच्यावर वणवा न लागण्याबाबत जबाबदारी देण्यात आली आहे तसेच वणवामुक्त गाव योजनेसाठी काही संस्थांनीही पुढाकार घेतला आहे; मात्र शासनाचे हे नियोजन वणवा लावणाऱ्यांमुळे अयशस्वी ठरते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 AM 20/Nov/2024