मंडणगड : निसर्गाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या ऑलिव्ह रिडले कासवांचे संवर्धन होणाऱ्या वेळास समुद्र किनाऱ्यावर कचरा व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सप्टेंबरमध्ये तालुक्यातील सर्व स्थानिक प्रशासकीय यंत्रणांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी एकत्रितपणे समुद्र किनारा स्वच्छतेची मोहीम राबवल्यानंतरही समुद्र किनाऱ्याची दुरवस्था झाली आहे.
सागरी कासव संवर्धन मोहिमेमुळे जगाच्या नकाशावर आलेल्या वेळास गावातील कासव महोत्सव विशेष प्रसिद्ध आहे. या महोत्सवामुळे गावातील पर्यटन उद्योगास चालना मिळाली असून, स्थानिक तरुणांना गावपातळीवर रोजगारही मिळाला आहे. नोव्हेंबरमध्ये कासवे समुद्र किनारी अंडी सोडण्यासाठी येत असतात. त्यात समुद्र किनाऱ्यावर घाणीचे साम्राज्य पसरल्याने कासवे अंडी न घालण्याची शक्यता आहे. वेळास समुद्र किनाऱ्याचे स्वच्छतेचे पालकत्व येथील एका कंपनीने घेतले आहे, असे असतानाही वेळास समुद्र किनाऱ्यावर प्लास्टिक, बाटल्या व अन्य कचऱ्याचे ढीग निर्माण झाले आहेत. स्वच्छतामोहिमेत गोळा करण्यात आलेल्या कचऱ्याचे वेळेवर विगतवारी न करण्यात आल्याने व यानंतरही कचरा होण्याचे सत्र सुरूच राहिल्याने यंत्रणांनी हाती घेतलेली मोहीम ही केवळ प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा उपक्रम आणि प्रसिद्धीचे माध्यम ठरल्याची चर्चाही या अनुषंगाने सुरू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 AM 20/Nov/2024