माहेर संस्थेतील प्रवेशितांनी बजावला मतदानाचा हक्क

रत्नागिरी : निराधारांचा आधारवड ठरलेल्या माहेर संस्था रत्नागिरी येथील दहा प्रवेशितांनी आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केले.

लोकशाहीमध्ये मतदान हा एक अमूल्य हक्क आहे आणि तो हक्क बजावण्याची संधी आज माहेर संस्थेत दाखल असणाऱ्या निराधार प्रवेशितांना मिळाला याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. माहेर संस्था गेली सत्तावीस वर्ष समाजातील अनाथ, निराधार, दुर्लक्षित, वंचित, रस्त्यावर फिरणाऱ्या, नातेवाईक नसणाऱ्या लोकांना सामाजिक प्रवाहात आणण्याचे महत्त्वाचे काम, संस्थेच्या संस्थापिका संचालिका सि. लुसी कुरियन यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहे. याचाच भाग म्हणून आज सर्वसामान्यांप्रमाणे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जिल्हा परिषद शाळा, हातखंबा, तारवेवाडी, मतदान केंद्र नंबर 266/249 येथे जाऊन माहेर संस्थेतील प्रवेशितांनी मतदान केले.

“समाजाने या निराधारांचा आदर्श घेऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा” असे मत माहेर संस्थेचे प्रकल्प प्रमुख, सामाजिक कार्यकर्ते, सुनील कांबळे यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:07 20-11-2024