गयाना आणि बार्बाडोसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘सर्वोच्च सन्मान’ जाहीर!

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांपैकी एक आहेत. नरेंद्र मोदी सध्या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. पहिल्यांदा नरेंद्र मोदी नायजेरियाला गेले. यानंतर ते जी-२० शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी ब्राझीलच्या रिओ दि जेनेरिओ येथे दाखल झाले.

यानंतर या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात नरेंद्र मोदी बुधवारी गयानाला पोहोचले आहेत.

दरम्यान, गयाना आणि बार्बाडोस या दोन्ही देशांनी नरेंद्र मोदींना त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा केली आहे. वृत्तानुसार, नरेंद्र मोदी यांना गयानाचे पंतप्रधान सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार “द ऑर्डर ऑफ एक्सलन्स” प्रदान करणार आहेत. तर, दुसरीकडे बार्बाडोस देशाचे पंतप्रधान सुद्धा नरेंद्र मोदींना “ऑनररी ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस” या प्रतिष्ठित पुरस्कारने सन्मानित करणार आहेत.

भारतीय पंतप्रधान गेल्या ५० वर्षांत पहिल्यांदाच गयानाला भेट देत आहेत. दरम्यान, गयानामध्ये भारतीय वंशाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात राहते. त्यांची संख्या जवळपास ३,२०,००० आहे. ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी विमानतळावर पोहोचले, त्यावेळी गयानाचे राष्ट्रपती इरफान अली आणि त्यांच्या १२ हून अधिक कॅबिनेट मंत्र्यांनी नरेंद्र मोदींचे स्वागत केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ नोव्हेंबरपर्यंत गयानामध्ये असतील आणि दोन्ही देशांमधील अनोख्या संबंधांना धोरणात्मक दिशा देण्याबाबत मोहम्मद इरफान अली यांच्याशी चर्चा करतील. याशिवाय, दुसऱ्या भारत-कॅरिकॉम शिखर परिषदेत नरेंद्र मोदी कॅरिबियन भागीदार देशांच्या नेत्यांची सुद्धा भेट घेणार आहेत.

‘ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर’ने मोदी सन्मानित
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपूर्वी नायजेरियाचा दुसरा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर’ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आले होते. या पुरस्काराने गौरव होणारे नरेंद्र मोदी हे दुसरे परदेशी व्यक्ती आहेत. गेल्या १७ वर्षांत भारतीय पंतप्रधान प्रथमच नायजेरियाला गेले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:17 20-11-2024